अरण्य वाचन…मोरोपंतांची केकावली

अनंत सोनवणे

नायगाव मयूर अभयारण्यात मोरांचा मुक्त, मनोहारी संचार खरंच सुखावणारा…

मराठवाडय़ातल्या बीड शहराच्या पश्चिमेला साधारणतः २० कि. मी. अंतरावर बीड-पाटोदा-नगर आणि बीड-लिंबादेवी – डोंगरकिन्ही – नगर या दोन रस्त्यांलगत डोंगराळ भूभाग पसरलेला दिसतो. हा भूभाग खुरटं आणि विरळ जंगल, दुय्यम प्रकारचं जंगल, काटेरी जंगल, गवताळ रान, माळरान तसच लागवड केलेल्या वृक्षांनी व्यापलेला आहे. या परिसरातच वसलंय नायगाव मयूर अभयारण्य.

हिंदुस्थानचा राष्ट्रीय पक्षी असलेला मोर हे या अभयारण्याचं प्रमुख आकर्षण आहे हे त्याच्या नावावरूनच ध्यानात येतं. दशकानुदशकं या परिसरात मोर मोठय़ा संख्येनं दिसत आहेत. म्हणूनच सरकारनं ८ डिसेंबर १९९४ रोजी हा परिसर खास मोरांचं अभयारण्य म्हणून संरक्षित केला. पावसाळा सुरू होताच इथं सर्वत्र मोरच मोर दिसू लागतात. तुम्ही रस्त्यानं पायी चालत असाल किंवा वाहनाने प्रवास करीत असाल तरी अचानक तुमच्या समोरून मोरांचा एखादा थवा उडत जातो किंवा रस्त्याच्या दुतर्फा मोर-लांडोरांच्या जोडय़ा दर्शन देतात. मध्येच एखाद्या झाडाच्या फांदीवर एखादा मोर आपला भलाथोरला पिसारा खाली सोडून निवांत बसलेला दिसतो; तर कधी एखादा थवा पाणवठय़ावर सावधपणे पाणी पिताना दिसतो. डोंगरदऱयांतून मोराचा ‘म्याओ म्याओ’ आवाज घुमत असतो. ध्यानीमनी नसताना तो अचानक आपल्या डोक्यावरून उडत जातो किंवा दुडूदुडू चालत रस्ता ओलांडतो. त्याच्या प्रत्येक दर्शनाने मन सुखावून जातं. मात्र मादीला आकर्षून घेण्यासाठी पूर्ण वाढ झालेला एखादा नर जेव्हा आपला मोठा पिसारा फुलवून नाचायला लागतो, तेव्हा आपलं मनसुद्धा थुईथुई नाचू लागतं. पूर्ण पिसारा फुलवून नाचणाऱया मोराला पाहताना निसर्ग देवतेच्या कलात्मकतेला कशी आणि किती दाद द्यावी? असा प्रश्न पडतो.

peacock-3

नायगाव मयूर अभयारण्याचं जंगल हे शुष्क पानगळीचं जंगल आहे. इथला बराचसा भूभाग डोंगराळ आहे. इथल्या वृक्ष-वनस्पतींमध्येही बरीच विविधता आढळते. त्यात प्रामुख्याने खैर, साग, धावडा, चिंच, अर्जुन, जांभूळ, तेंदू, कवठ, चंदन, बहावा, कडुनिंब, करवंद, बोर, घाणेरी इत्यादी वनस्पती व वृक्षांचा समावेश होतो. वनस्पतींच्या वैविध्यामुळे साहजिकच वन्य जीवांची विविधताही इथं बऱयापैकी आढळते. हे अभयारण्य प्रामुख्यानं मोरांसाठी प्रसिद्ध असलं तरी इथं इतरही अनेक प्रकारचे प्राणी व पक्षी पाहायला मिळतात. वन्य प्राण्यांमध्ये लांडगा, कोल्हा, खोकड, काळवीट, साळिंदर, तरस, ताडमांजर, रानमांजर, रानससा इत्यादी प्राणी इथं दिसतात. पक्ष्यांच्या शंभरहून जास्त प्रजाती इथं पाहायला मिळतात. त्यात चक्रवाक, रंगीत करकोचा, जांभळा व राखी बगळा, खंडय़ा, लालसरी, रानलावा, ढोकरी, राखी तित्तर, काळा कंकर इत्यादी पक्ष्यांचा समावेश होतो. हे अभयारण्य वर्षभर पर्यटकांसाठी खुलं असतं. मात्र पावसाळय़ात इथलं सौंदर्य काही औरच असतं. पाऊस सुरू होताच डोंगर हिरवेगार होतात आणि ठिकठिकाणी नाचणारे मोर दिसू लागतात. पायी भटकतसुद्धा वन्य जीव निरीक्षण करता येतं.

नायगाव मयूर अभयारण्याच्या क्षेत्रात अनेक गावं आहेत. त्यामुळे मानव-वन्य जीव संघर्ष थोडय़ा प्रमाणावर होतोच. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणें गरजेचं आहे. तसं झालं तरच जैवविविधतेचा हा अनमोल ठेवा पुढच्या पिढय़ांपर्यंत सुखरूप पोहोचू शकेल.

नायगाव मयूर अभयारण्य

प्रमुख आकर्षण…मोर

जिल्हा…बीड

राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…२९.८४ चौ. कि. मी.

निर्मिती…१९९४

जवळचे रेल्वे स्थानक…बारसी (९८ कि. मी.)

जवळचा विमानतळ…संभाजीनगर (१५५ कि.मी.)

निवास व्यवस्था…बांधकाम खात्याचे विश्रामगृह, बीडमध्ये खासगी हॉटेल्स

सर्वाधिक योग्य हंगाम…जुलै ते ऑक्टोबर

सुट्टीचा काळ…नाही

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही