शेकापच्या ‘बाब्या’साठी सरकारी आदेश धाब्यावर

1

सामना प्रतिनिधी । अलिबाग

आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचे ते ‘कार्टे’ असे नेहमीच म्हटले जाते. रायगड जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शेकापचा कारभारही असाच काहीसा झाला असून एका महत्त्वाच्या कार्यकर्त्यासाठी चक्क सरकारी आदेशच धाब्यावर बसवण्यात आले आहेत. विनापरवानगी अथवा बेकायदा घराला घरपट्टी देताना पावतीवर बेकायदा शेरा मारण्याचे स्पष्ट आदेश असतानाही स्थायी समितीने मापगाव येथील महम्मद वाकनीस यांचे बांधकाम अधिकृत करण्याचा घाट घातला आहे. यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तसे फर्मानच ग्रामसेवकांना काढले आहेत. जिल्हा परिषदेच्या या प्रतापाने विरोधी पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

१८ जुलै २०१६ रोजी शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामे अनधिकृत असली तरी त्यांना घरपट्टी आकारावी असे नमूद केले आहे. त्याचवेळी घरपट्टीच्या पावतीवरील अनधिकृत असल्याचा शेरा कायम ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र असे असताना रायगड जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शेकापने शासनाचे आदेश धुडकावत आपल्या मर्जीने कारभार सुरू ठेवला आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील महम्मद वाकनीस यांच्या घरपट्टीवरील शेरे कोष्टकात मारलेला अनधिकृत असा शेरा काढण्याचे आदेश ग्रामसेवकाला देण्यात आला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात तसे नमूद केले आहे. सामाजिक कार्यकर्ते सावंत यांनी या प्रकरणाचा भंडाफोड केल्यानंतर माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी जिल्हा परिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कोकण आयुक्तांकडे तक्रार करणार
जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी आपला ‘हम करे सो कायदा’ कायम ठेवला तर याविरोधात कोकण आयुक्तांकडे तक्रार करू, असा इशारा मधुकर ठाकूर यांनी दिला आहे. इतकेच नाहीतर जिल्हा परिषदेची स्थायी समिती बरखास्त करण्याची मागणीही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.