पेण : सोसायटीचे सांडपाणी रस्त्यावर; रहिवाशांचा उपोषणाचा इशारा


सामना प्रतिनिधी, पेण

एकीकडे पेण नगरपालिका स्वच्छ भारत अभियान मोठ्या जोरात राबवत आहे, तर दुसरीकडे याच शहरातील प्रभातनागर चिंचपाडा येथे एका बांधकाम व्यावसायिकाने सोसायटीचे सांडपाणी खड्डा खणून रस्त्यावर सोडण्याचा प्रताप केला आहे.

पेण शहरातील प्रभातनागर चिंचपाडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सिद्धी समर्थ या सोसायटीचे सांडपाणी कोणतेही नियोजन न करता खड्डा खणून त्यात सोडले आहे. या विरोधात शेजारी असलेल्या जगदंब आशिष सोसायटीच्या सदस्यांनी पेण नागरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून या इमारतीच्या बांधकाम व्यवसायिक व त्यांना ना हरकत दाखला देणाऱ्या नगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.

पेण चिंचपाडा येथील नव्याने विकसित होत असलेल्या प्रभात नगर येथे मुंबई येथील बालाजी डेव्हलपर्सतर्फे सिद्धी समर्थ ही इमारत बांधण्यात आली आहे. मात्र या इमारतीचे सांडपाणी नगरपालिकेच्या नाल्यात न सोडता खड्डा खणून त्यामध्ये सोडण्यात आले आहे. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून, या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत या इमारतीच्या शेजारी असलेल्या जगदंब आशिष इमारतीमधील विजय पाटील यांनी पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्याकडे लेखी तक्रार करुन संबंधित बिल्डर व इमारतीच्या सांडपाण्याचे नियोजन नसतांना वापर परवाना देणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत पेण नगरपालिकेने संबंधित बांधकाम व्यावसायिक यांना आज नोटीस दिली असून पुढील दहा दिवसांत हा खड्डा बुजविण्याचे आदेश दिले आहेत. न बुजविल्यास फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
– प्रवीण कदम
मुख्य अभियंता ,पेण नगरपालिका