आरटीओने मागण्या मान्य न केल्यास सामूहिक जलसमाधी… विक्रम चालकांचा इशारा

1

सामना प्रतिनिधी। पेण

आरटीओने विक्रम चालकांच्या मागण्या मान्य न केल्याने रायगडातील विक्रम चालक मालक मंगळवार 12 फेब्रुवारी रोजी सामूहिक जलसमाधी घेणार असा इशारा विक्रम चालक मालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय पाटील यांनी पेण येथे पत्रकार परिषदेत दिला. या पत्रकार परिषदेला तालुका अध्यक्ष शशिकांत म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तेजस पाटील, विजय सोनवणे, हेमंत पाटील, रामचंद्र पाटील यांच्यासह विक्रम मिनिडोअर चालक मालक मोठया संख्येने उपस्थित होते.

पेण तालुक्यातील 80 गावे,तर अलिबाग तालुक्यातील 119 गावे ग्रामीण भागात असताना शहरी भागाचे नियम लावल्याने 16 वर्षांपुढील विक्रम गाड्या चांगल्या स्थितीत असूनसुद्धा मोडून टाकावी ( स्क्रॅब करावी ) लागत आहे. पेण अलिबाग तालुक्यातील 715 विक्रम मिनिडोअर चालक मालकांच्या पोटावर पाय येणार असून जिल्ह्य़ातील हजारो विक्रम चालक मालक अडचणीत आले आहेत. पेण अलिबाग सारख्या या ग्रामीण भागांसाठी हे नियम शिथिल करण्यात यावेत आणि सुस्थितीत असणाऱ्या मीटर टॅक्सी / ऑटो वाहने त्वरित पासिंग करून मिळावेत तसेच त्या वाहनांची वयोमर्यादा 16 वर्षा वरून 20 वर्ष करण्यात यावी आशा प्रकारचे निवेदन रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील यांनी पेण परिवहन कार्यालयाच्या अधिकारी उर्मिला पवार यांना दिले होते. परंतु निवेदन देऊन अनेक दिवस झाले असून त्यावर प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्याने उद्या मंगळवार रोजी पेण अलिबागला जोडणाऱ्या धरमतर पुलावरून सामूहिकरीत्या उडी मारून जलसमाधी घेण्याचा इशारा विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला मंगळवारी पेण अलिबाग येथील विक्रम सेवा बंद ठेवण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.

रायगड जिल्ह्यातील बहुतांश वाहने ही आजही सुस्थितीत आहेत. मात्र वाहनांच्या वर्षाच्या नियमामुळे वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पासिंगसाठीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन करून पासिंग होत नाहीत. त्यामुळे अगोदरच गाडी पसिंगसाठी 70 ते 80 हजार रुपये खर्च करून वाहने पसिंगसाठी बनविले असतानाही पासिंग न केल्यामुळे हे चालक मालक आपला व्यवसाय करू शकत नसल्याने हजारो विक्रम चालकांवर उपासमारीची वेळ प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आल्याने अखेर विक्रम चालक मालक सामूहिक जलसमाधी घेणार आहेत व याकरिता सर्वस्वी प्रादेशिक परिवहन अधिकारी जबाबदार असतील असे विजय पाटील यांनी सांगितले.