पेंच नदी काठी….

अनंत सोनवणे

मोगली या काल्पनिक पात्रामुळे आपलं मराठमोळं पेंच अभयारण्य जगाच्या नकाशावर आलं

रुडंयार्ड किपलिंग यांच्या सुप्रसिद्ध ‘जंगलबुक’ मधला मोगली आठवतोय? बघिरा, बबलू आणि अकेला हे त्याचे मित्र आठवतायत? मग शेरखानही तुम्हाला नक्कीच आठवत असणार. ज्या जंगलात मोगली विरुद्ध शेरखान ही संघर्षकथा घडते, ते जंगलही तुम्ही विसरले नसणार. हिरवंकंच, घनगर्द, गूढ जंगल… मोगलीसह सर्व प्राणिमात्रांचं आश्रयस्थान… कायम पार्श्वभूमीवर राहणारं मात्र कथानकातलं एक प्रमुख पात्र. तुम्हाला माहितीय का हे मोगलीच्या गोष्टीतलं जंगल नेमकं कोणतं आणि कुठं आहे?

‘जंगलबुक’च्या माध्यमातून जगभरात पोचलेलं हे जंगल म्हणजे आपला पेंच व्याघ्र प्रकल्प. महाराष्ट्र (नागपूर) आणि मध्य प्रदेश (सिवनी आणि छिंदवाडा) या दोन राज्यांमध्ये पसरलेलं हे जंगल हिंदुस्थानातल्या अत्यंत समृद्ध व सुंदर जंगलांपैकी एक मानलं जातं. ११८३ मध्ये इथं प्रथम पेंच वन्य जीव अभयारण्याची निर्मिती झाली. नंतर त्याला राष्ट्रीय उद्यानाचा आणि १९९२ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. मध्य हिंदुस्थानातल्या सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिणी उतारांवर पेंचचं विशाल जंगल पसरलंय. इथून वाहणाऱया पेंच नदीच्या नावावरून या जंगलाला पेंच हे नाव मिळालंय. या नदीवर व्याघ्र प्रकल्पातच एक मोठं धरण बांधण्यात आलंय. त्याचं नाव तोतलाडोह धरण. हिवाळय़ानंतर जेव्हा धरणातलं पाणी कमी व्हायला सुरुवात होते, तेव्हा धरणाकाठच्या ओलसर जमिनीवर कोवळं गवत उगवू लागतं. मग उन्हाळय़ाच्या दिवसांत तृणभक्षी प्राण्यांची इथं लगबग सुरू होते. साहजिकच त्यांना भक्ष्य बनवणाऱया शिकारी प्राण्यांची पावलंही इथं वळतात. त्यामुळे वन्य प्राण्यांचं दर्शन सुलभ होतं.

tiger-nature

वाघ हे पेंचचं प्रमुख आकर्षण आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाजूलाही वाघांची संख्या चांगली आहे. उत्कृष्ट नैसर्गिक अधिवास, तृणभक्षी प्राण्यांची मोठी संख्या आणि वनविभागाचे परिश्रम या साऱयाचा हा परिपाक आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या वाघांप्रमाणेच इथले वाघही पर्यटकांना चांगलेच सरावलेत. त्यामुळे पर्यटकांसमोरचा त्यांचा वावर कसलेल्या अभिनेत्यांसारखा सहज असतो. इथली कॉलरवाली वाघीण रणथंबोरच्या मछली वाघिणीसारखी तमाम वन्य जीवप्रेमींच्या गळय़ातला ताईत आहे. हिंदुस्थानातली सर्वाधिक पिल्ले जन्माला घालणारी वाघीण म्हणून ती ओळखली जाते.

याशिवाय बीएमडब्ल्यू, रायकस्सा, हॅण्डसम हे वाघ आणि बाघिनाला, दुर्गा या वाघिणी पेंचच्या स्टार वाघांमध्ये गणले जातात. त्यांना पाहायला जगभरातून व्याघ्रप्रेमी येतात. इथं वाघाबरोबरच बिबटय़ा, रानकुत्रे, अस्वल, नीलगाय, चितळ, सांबर, चौशिंगा, काकर, रानगवा, तरस, लांडगा, साळिंदर, खवल्या मांजर, उदमांजर, ताडमांजर, रानमांजर, कोल्हा, रानडुक्कर, वानर इत्यादी वन्य प्राणीही आढळतात. सरपटणाऱया प्राण्यांमध्ये अजगर, नाग, मण्यार वगैरे १३ जातींचे जीव सापडतात.

monkey-5

पक्ष्यांच्या बाबतीतही पेंचचं जंगल अतिशय समृद्ध आहे. इथं पक्ष्यांच्या २२५ पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. सुरुवातीला उल्लेख केलेली मोगलीची कथा भले काल्पनिक असो, पण त्याचं अस्तित्व असंच टिकून राहावं, यासाठी वन्य जीवप्रेमींनी वनविभाग आणि सरकारवरचा दबाव कायम राखणं गरजेचं आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्प

प्रमुख आकर्षण…वाघ

जिल्हा… नागपूर + सिवनी, छिंदवाडा

राज्य…महाराष्ट्र + मध्य प्रदेश

क्षेत्रफळ…७४१ चौ.कि.मी.

निर्मिती…१९८३

जवळचे रेल्वे स्थानक…नागपूर

जवळचे विमानतळ…नागपूर (६० कि.मी.)

निवास व्यवस्था…पर्यटन विकास महामंडळाची रिसॉर्टस्, खाजगी हॉटेल्स.

सर्वाधिक योग्य हंगाम…नोव्हेंबर ते मे

सुट्टीचा काळ…पावसाळा

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…बुधवार

deer-nature