सावधान, स्मार्टफोन मेंदूचा ताबा घेतोय

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. फोन सापडला नाही, चार्जिंग उतरले, रेंज नसली तरी अनेकजण अक्षरश: बैचेन होतात. स्मार्टफोनचे हे वेडच जणू. याचे दुष्परिणाम मोठय़ा प्रमाणात दिसू लागले आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे एकटेपणासह नैराश्य आणि चिंतेने ग्रासले जातो. अमेरिकेच्या एका सर्वेक्षणातून ही चिंताजनक बाब समोर आली आहे.

स्मार्टफोनचे व्यसन आणि न्यूरॉलोजी यासंदर्भातील संशोधन ‘न्यूरो रेग्युलेशन’ या जर्नलमध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहे. या संशोधनासाठी १३५ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून असे दिसून आले की, जे विद्यार्थी दिवसातील जास्तीत जास्त वेळ मोबाईलच्या सहवासात  असतात त्यांना नैराश्य आणि एकाकीपणाची सवय लागते. विद्यार्थी अभ्यास, क्लास, जेवण-खाणं किंवा टीव्ही अशा विविध गोष्टीत अडकलेले असतात. त्यामुळे मनाने आणि शरीराने रिलॅक्स व्हायला त्यांना वेळ मिळत नाही, असे अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रा. एरिक पेपर यांनी सांगितले.

– स्मार्टफोनच्या वेडामुळे समोरासमोरचा संवाद खुंटतो

– मोबाईलवर येणारी सततची नोटिफिकेशन, व्हायब्रेशन्स आणि अलर्ट मेसेज यामुळे सतत मोबाईल तपासण्याची सवय लागते.  मेसेज आला नसेल किंवा नोटिफिकेशन आलेले नसले तरी नकळत हात मोबाईलकडे वळतो.

– मोबाईलच्या व्यसनातून बाहेर पडायचे असेल तर आधी स्वतŠला चार्ज करा आणि प्रशिक्षण द्या, असे तज्ञांचे म्हणणे आहे. पुश नोटिफिकेशन्स बंद करून किंवा दिवसाचा ठरावीक वेळ सोशल मीडियासाठी राखून ठेवला तर या व्यसनातून बाहेर पडता येईल.