पाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

वांबोरी चारीचे पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील सातवड येथील ग्रामस्थांनी  पालकमंत्री राम शिंदे व आमदार शिवाजी कर्डिले यांचा पुतळा जाळत निषेधाच्या घोषणा दिल्या. वांबोरी चारीचे आवर्तन सध्या सुरू असून काही गावांना  कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने या गावामध्ये नाराजी आहे. या विषयावर तिसगाव मिरी गटाचे शिवसेनेचे  जि. प. सदस्य अनिल  कराळे व पंचायत समिती सदस्या गगुंबाई  आटकर काहीच करत नाही असा आरोप करत सातवड ग्रामस्थांनी या दोघांचा पुतळा जाळला. त्या नंतर आज कराळे हे सातवड ला आले व त्यांनी आंदोलकांची भेट घेत आपली बाजू मांडली. ती मांडताना कराळे यांनी आमदार कर्डीले यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. या वेळी बोलताना कराळे  म्हणाले कि “कर्डीले म्हणतात वांबोरी चारी आणायला मी होतो त्यांचा काय  संबंध आहे. ज्या वेळी चारी मंजूर झाली त्या वेळी कर्डीले  तिकडे दूध काढीत होते. त्यांच्या  नऊ वर्षाचा आमदारकीच्या कालावधीत धरणातील पाण्यात असलेल्या चारीचा फुटबॉल इंचभर सुद्धा खोल करता आला नाही. जनता दुधखुळी नाही. प्रस्थापिताच्या  विरोधात संघर्ष म्हणता पण खरे प्रस्थापित तुम्ही आहात. जावई, मुली, सोयरे सगळे सगळे वर्षानुवर्ष सत्तेत आहेत व कर्डीले स्वतः  अनेक वर्ष आमदारकीला चिटकून आहात. तरीही तुम्ही विस्थापित कसे? कर्डीले यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून आंदोलकांशी संवाद साधू दिला नाही. पाण्याचे खोटे पूजन करून गावोगावी मिरवत बसले आमचे पुतळे जाळल्याने  दुःख होत नाही पण प्रश्न सुटणार असेल तर पुतळा जाळा मला आनंदच होईल. चारीचे कर्डीले यांना  काय माहित आहे. त्यांचे योगदान नसल्याने त्याविषयी बोलण्याचा त्यांना  अधिकार नाही.  डोळे वटारून राजकारण करण्याचे दिवस संपले आहेत.  स्वतःचे पुढारपण मिरवण्यासाठी तुम्हीच या प्रश्नाचे भांडवल करतात. चारीला पाणी देऊ शकत नाही” हे आमदाराचे अपयश आहे असे सांगत कराळे यांनी आपल्या भाषणातून सर्व खापर कर्डीले यांच्यावर फोडले व ते निघून गेले.

सातवड येथे पाणी मिळावे या साठी तीन तास ग्रामस्थ आज सकाळी धरणे आंदोलन करत बसले होते मात्र तो पर्यंत कोणीही प्रशासकीय अधिकारी न आल्याने व कराळे निघून गेल्या नंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी पालकमंत्री राम शिंदे व आमदार शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन करत या दोघांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात उपसरपंच राजेंद्र पाठक, बंडू पाठक, संजय पाठक, नानासाहेब पाठक, छानराज क्षेत्रे,  प्रकाश शेलार आदी ग्रामस्थांनी भाग घेतला