दहानंतर फटाके फोडल्याचा FB live अंगाशी येणार,पोलिसांची शोध मोहीम

1

सामना ऑनलाईन। लुधियाना

रात्री दहानंतर फटाके वाजवत त्याचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण करणाऱ्यांचे आता काही खरे नाही. कारण अशा अतिउत्साही लोकांना शोधून काढण्यासाठी लुधियाना पोलिसांनी नागरिकांचे  FB live तपासण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत रात्री दहानंतर फटाके वाजवणाऱ्या 12 अज्ञातांवर लुधियाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रात्री दहानंतर फटाके फोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. पण दिवाळी असल्याने उत्साहाच्या भरात लोकांक़डून या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. लुधियानात नागरिक संध्याकाळी पाच ते रात्री उशीरापर्यंत फटाके फोडून दिवाळी साजरी करत आहेत. यामुळे शहरात रात्री उशीरा फटाके फोडणाऱ्यांना शोधून काढणे पोलिसांना कठीण झाले आहे. कोण कोणत्या गल्लीत नक्की कुठुन फटाके फोडतोय हे शोधताना पोलिसांची पुरती दमछाक होत आहे. यामुळे पोलिसांनी रात्री दहानंतर फटाके फोडत असल्याचे FB live करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. यासाठी पोलीस नागरिकांच्या सोशल साईट्स तपासत आहेत.