रेल्वे स्टेशनच्या सरकत्या जिन्यावर प्रवासी कोसळले

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

देवगिरी एक्स्प्रेसने आलेले प्रवासी सरकत्या जिन्यावरून चढताना महिला प्रवाशाचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. महिलेला पकडण्याचा प्रयत्न करताना अन्य प्रवासी महिला आणि पुरुषदेखील एकमेकांच्या अंगावर पडल्याची घटना प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर शनिवारी रात्री घडली. प्रसंगावधान राखून सरकत्या जिन्याचे बटन बंद केल्यामुळे ‘एल्फिन्स्टन’ सारखी मोठी घटना होता होता टळली.

सिकंदराबाद ते मुंबई देवगिरी एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आली. रेल्वे आल्यानंतर सर्व प्रवाशांची धावपळ सुरू झाली. सर्वसामान्य प्रवासी जागेचा शोध घेत रेल्वे प्लॅटफॉर्मवर लगबगीने जाऊ लागले, तर रेल्वेतून उतरलेले प्रवासी रेल्वेस्टेशनमधून लवकर बाहेर पडण्यासाठी गडबड करत दादरा आणि सरकत्या जिन्याकडे जाऊ लागले. सरकत्या जिन्यावरून प्रवाशांची चढण्यासाठी गर्दी झाली. सरकत्या जिन्याच्या खाली वर चढण्यासाठी प्रवासी आले. सरकत्या जिन्याच्या पायऱ्या चढताना सावधपणे त्या चढू लागले. मात्र त्याच दरम्यान ग्रामीण भागातील महिला आल्या. त्या सरकत्या जिन्याची पायरी चढताना एक महिला मागे पुढे करत असतानाच आलेल्या प्रवाशांचा धक्का लागला आणि ती महिला खाली कोसळत असताना तिच्यासोबत असलेल्या महिलेने तिला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दोन्ही महिला पायऱ्यांवर पडल्या. एकच गोंधळ झाला. काय करावे काही सुचेना. प्रवाशांची धांदल उडाली त्याचवेळी देवगिरी एक्स्प्रेस गाडी पकडण्यासाठी तीन चार प्रवासी उलट्या दिशेने सरकत्या जिन्याच्या पायऱ्या उतरत येऊ लागल्यामुळे तेसुद्धा आहे त्याच पायऱ्यांवर येत होते. जिन्याच्या पायऱ्यावर आरडा ओरड सुरू झाली.

जेट एअरवेजचे अहमद जलील हे आपल्या कुटुंबीयांसोबत सरकत्या जिन्याच्या पायऱ्या चढून मध्यभागी आले होते, मात्र त्याच वेळी जिन्यामध्ये सुरू असलेला गोंधळ पाहून त्यांनी सावधपणाची भूमिका घेत सहाव्या पायरीवरून खाली उडी मारून पायऱ्यावर पडणाऱ्या महिलांना बाजूला ढकलले. ज्या महिला खाली पडल्या होत्या त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला किरकोळ दुखापत झाली. काही सेकंदामध्ये घडलेल्या घटनेने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता. जलील यांनी पायऱ्यांवरून उडी मारल्यामुळे त्यांच्या पायाला आणि पाठीला किरकोळ दुखापत झाली. सरकत्या जिन्यावरील गोंधळ पाहून एका प्रवाशाने तातडीने सरकता जिना बंद करण्याचे बटन दाबल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जिना सुरू राहिला असता तर महिला – प्रवासी पायऱ्यांवरून गडगडून खाली पडले असते.

रेल्वे प्रशासनाने हात केले वर

प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरील सरकत्या जिन्यावर घडलेल्या घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता स्टेशन अधीक्षकासह अन्य कर्मचाऱ्यांनी, असे काही घडलेच नाही, म्हणत हात वर केले.

सरकत्या जिन्यावर कर्मचारी ठेवा

रेल्वे येण्यापूर्वी किंवा जाण्यापूर्वी सरकता जिना चालू केला जातो. केव्हा केव्हा तर या जिन्यावर स्टेशनवर फिरणारी लहान मुले खेळ खेळ म्हणून खेळत असतात. मनाला वाटेल ते बटन दाबत असतात, जिना बंद झाला की वाटेल त्या खोड्या ते करत असतात. हे सर्व प्रकार रेल्वे प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना माहीत असतानादेखील त्यांनी या जिन्यावर कर्मचारी नियुक्त केला नाही. या जिन्यावर कर्मचारी नियुक्त केला असता तर जिन्यावरून चढ-उतार करणाऱ्या प्रवाशांची अडचण झाली नसती. प्रवाशांना वेळेवर मदत मिळाली असती. त्यामुळे दोन्ही बाजूच्या सरकत्या जिन्यावर कर्मचारी नियुक्त करावेत, अशी प्रतिक्रिया जेट एअरवेजचे व्यवस्थापक अहमद जलील यांनी ‘सामना’शी बोलताना दिली.