झगडे फाटा ते पुणतांबा फाटा रस्त्याची दूरवस्था; दुरुस्तीची मागणी

53


सामना प्रतिनिधी । कोपरगाव

नागपूर-मुंबई या महामार्गावरील झगडे फाटा ते पुणतांबा फाटा हा रस्ता मुंबई-पुणे-नाशिक या मोठ्या शहरांकडे जातो. त्यात शिर्डीकडे जाणारी अवजड वाहतूक या बाजूने वळविण्यात आली आहेत. त्यामुळे या मार्गावरील वर्दळ वाढली असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे या परिसरातील चांदेकसारे पोहेगावकुंभारी येथील नागरिकांनी विविध प्रकारे आंदोलन केल्याने सरकारला दखल घ्यावी लागली आहे. सरकारने या 8 किलोमीटरच्या रस्त्यासाठी तीन वर्षापूर्वी कोट्यवधींचा भरघोस निधी दिला होता. परंतु निकृष्ट कामामुळे तीन वर्षातच रस्त्याची दूरवस्था झाली असून या रस्त्याच्या खड्ड्यात प्रवाशांना ठेकेदाराचा चेहरा दिसू लागल्याची टीका चांदेकसारेचे माजी सरपंच केशव होन यांनी केली आहे. लोकांच्या जिवावर उठलेल्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर अधिकाऱ्यांना वेठीस धरून अनोखे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

झगडे फाटा ते पुणतांबा फाटा या रस्त्याची अवस्था खराब असल्याने अनेक आंदोलने, उपोषण, व रास्ता रोको आंदोलन झाले तेव्हा रस्त्याचा प्रश्नही मार्गी लागला. कोट्यवधी रुपयाचा निधी या रस्त्यासाठी खर्च झाला. मात्र तीन वर्षांतच या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी बाभळीचे साम्राज्य प्रस्थापित झाले आहे. वाहन चालवताना जीव मुठीत धरून वाहनचालकांना या रस्त्याने प्रवास करावा लागतो. समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्यामुळेही या ठिकाणी मोठे अपघात होतात. खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांना अपंगत्व आले आहे. अनेकवेळा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी केली. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाला आहे. आम्हाला खड्डे बुजविण्याचा अधिकार नाही, असे सांगून जबाबदारी झटकत आहेत. अशा अधिकाऱ्यांना योग्य ती अद्दल घडविल्याशिवाय त्यांना आपल्या जबाबदारीची होणार नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारले असता डांबर शिल्ल्लक शिल्लक नाही अशी उडवाउडवीचे उत्तर देऊन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप होन यांनी केला.

अशा मिजासखोर अधिकाऱ्यांना आता जनतेनेच धडा शिकवण्याची वेळ आली आहे. अधिकारी जबाबदारी झटकू पाहत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही, आता यापुढची आंदोलने जनतेला वेठीस धरणारी नाही तर अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देणारी असतील, यापुढे अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला आणि घरालाच आंदोलनाचे लक्ष करण्यात येईल असा इशारा होन यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या