मतदार नोंदणी करताना होतोय सर्व्हर डाऊन

सामना प्रतिनिधी । मुंबई

मतदार नोंदणीची शेवटची तारीख 30 मार्च आहे, परंतु जसजशी तारीख जवळ येईल तसतसे मतदारांना नोंदणी करणे कठीण होत चालले आहे. कारण नोंदणीसाठीचा अर्ज भरताना संबंधित वेबसाइट वारंवार हँग होत असल्याच्या तक्रारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून येऊ लागल्या आहेत. इतकेच नाही तर मतदार यादीत आपले नाव पाहतानाही सर्व्हर डाऊन होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेकांना आपली नावेही पाहता आलेली नाहीत.

अर्ज भरताना सुरुवातीला आपली सर्व माहिती पटापट भरता येते, मात्र शेवटच्या टप्प्यात बरोबर स्क्रीनवर हँग आणि फक्त हँग झल्याचेच दिसते किंवा सर्व्हर डाऊन झाल्याचे दिसत असल्याच्या तक्रारी आहेत. सर्व्हर डाऊन झाल्याचे दिसले की मग पुन्हा नव्याने अर्ज करण्याच्या सूचना करण्यात येतात. म्हणजेच कॉम्प्युटर पुन्हा अर्जाच्या सुरुवातीला आणून सोडत असल्याचे ठाण्याच्या रहिवासी दीप्ती पांचाळ यांनी सांगितले, परंतु कुठल्याही परीस्थितीत नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजावणार असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, मतदारांना www.nsvp.in या वेबसाइटवर जाऊन आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहायचे आहे. तसेच याच वेबसाइटवर जाऊन नाव नोंदणीही करता येणार आहे.

विधानसभा क्षेत्र बदलतानाही मारामार
सचिन कुलकर्णी हे पूर्वी मुलुंड येथे राहत होते, मात्र गेल्या आठ वर्षांपासून ते ठाणे येथे राहण्यासाठी आले. त्यामुळे त्यांना त्यांचे नाव मुलुंड येथून काढून ठाणे मतदारसंघात नोंदवायचे होते. त्यासाठी त्यांनी अनेकदा अर्ज केला, पण त्यांना यश आले नाही. त्यामुळे ते अजूनही मुलुंड येथेच मतदान करत असल्याचे कुलकर्णी म्हणाले.