गोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह


सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

गोड पदार्थांच्या सेवनाबरोबरच हवेतील प्रदूषणामुळेही मधुमेहींच्या संख्येत वाढ होत असल्याचा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे. लेसेंट प्लॅनेटरी हेल्थ या वैद्यकिय मासिकात याबदद्ल अहवाल प्रसिद्ध कऱण्यात आला आहे.
हिंदुस्थानमध्ये २०१७ साली मधुमेही रुग्णांची संख्या ७.२ कोटी होती. हा आकडा जगातील एकूण मधुमेहींच्या अर्धा आहे. पण २०२५ पर्यंत हाच आकडा दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानमध्ये मधुमेहावर वर्षभरात होणारा अंदाजित खर्च हा १५ अरब डॉलरहून अधिक आहे. तर पंजाब, कर्नाटक, आणि तमिळनाडू सारख्या राज्यात मधुमेही रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. जीवनशैली, जेवणाच्या अनियमित वेळा, यामुळे शहरात राहणाऱ्या गरीब लोकांपासून उच्चभ्रूपर्यंत सगळ्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. २५ वर्षाहून कमी वय असलेल्या चार हिंदुस्थानी व्यक्तींपैकी एकजण हा मधुमेहग्रस्त आहे.

विकसनशील देशांमध्ये वायु प्रदूषणामुळे हृद्यासंबंधी व श्वसनासंबंधीही तक्रारीही वाढल्या आहेत. तसेच अशा देशांमध्ये प्रदूषणामुळे मधुमेह झालेल्या, स्मृतीभ्रंश झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. असेही संशोधकांनी अहवालात म्हटले आहे. मॅक्सिको शहरात तर हवेतील प्रदूषणाचा परिणाम कुत्र्यांच्या मेंदूवर होत असल्याची अनेक उदाहरणे समोर येऊ लागली आहे. मधुमेह व हवेतील प्रदूषण यांचा संबंध या प्रयोगासाठी संशोधकांनी १७ लाख अमेरिकेन नागरिकांवर संशोधन केले होते. यात गेल्या आठ वर्षापासून मधुमेहाने पीडित असलेल्या पण ज्यांचा मधुमेहाचा इतिहास नाही अशा व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यांना प्रदूषित हवेचा धोका नसलेल्या ठिकाणी ठेवण्यात आले. त्यावेळी त्यांच्यातील साखरेचे प्रमाण सामान्य व्यक्तींएवढेच आढळले.