सांगोडा ग्रामविकास अधिकाऱ्यास जबर मारहाण

प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । कल्याण

कल्याण तालुक्यातील सांगोडा – कोंढेरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी अर्जुन इंगोले यांना ग्रामपंचायत कार्यालयातच लाथाबुक्यानी जबर मारहाण करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात लक्ष्मण केणे या हल्लेखोराविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केणे हे आठ ‘अ’ दाखला मागण्यासाठी आले होते. मात्र संगणक बंद असल्याने उद्या दाखला देतो असे ग्रामविकास अधिकारी इंगोले यांनी सांगितले. याचा राग येऊन केणे याने थेट इंगोले यांना मारहाण केली. इंगोले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण तालुक्यात ४६ ग्रामपंचायती असून ७ ग्रामविकास अधिकारी तर उर्वरित ग्रामसेवक आहेत. यातील सांगोडा कोंढेरी ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अर्जुन इंगोले हे सोमवारी कार्यालयात काम करत होते. यावेळी कोंढेरी गावातील लक्ष्मण केणे हा आला आणि आठ ‘अ’ चा उतारा मागू लागला. यावर ग्रामपंचायतीचा संगणक बंद आहे उद्या या असे त्यांना सांगण्यात आले. यावर मला आताच संगणकीकृत उतारा हवा म्हणून केणे वाद घालू लागला. वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. लक्ष्मण केणे याने शिविगाळ करीत इंगोले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विशेष म्हणजे मारहाण सुरू असताना उपसरपंच दिनेश गायकर आणि पोलीस पाटील राम केणे कार्यालयात उपास्थित होते. मात्र त्यांनी काहीच हस्तक्षेप केला नसल्याचे इंगोले यांनी सांगितले. दरम्यान इंगोले यांच्यावर कल्याण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल केणे याच्याविरुद्ध आज गुन्हा दाखल करण्यात आला.

… तर काम बंद आंदोलन
ग्रामसेवकांवर वारंवार हल्ले सुरूच आहेत. मात्र जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी आहे. हल्लेखोर लक्ष्मण केणे याच्याविरुद्ध केवळ गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली नाही तर शुक्रवारपासून काम बंद आंदोलन केले जाईल.
– उदय शेळके, ठाणे जिल्हा ग्रामसेवक संघटना अध्यक्ष.