फेसबुकचा लोकांना आता कंटाळा यायला लागलाय ?

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

बदलत्या काळानुसार लोकांची समाजमाध्यमांबाबतची आवडही बदलत जाते. एकेकाळी ऑर्कुट हे माध्यम लोकं त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरत होतं, त्याच काळात व्हॉटसअॅपच्या जागी निंबझ सारखी माध्यमं वापरली जात होती. मात्र काळाच्या ओघात ही दोन्ही माध्यमं गायब झाली आणि फेसबुक, व्हॉटसअॅप, ट्विटर, स्नॅपचॅट, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांचा उदय झालाय. यातील फेसबुक हे हिंदुस्थानासह जगभरातील असंख्य लोकांच्या आवडीचं माध्यम आहे. मात्र आता फेसबुकचाही लोकांना कंटाळा यायला लागल्याचं कळालं आहे. फेसबुकचा निर्माता मार्क झकरबर्गनेच अप्रत्यक्षरित्या याची कबुली दिली आहे.

फेसबुकवर लिहलेल्या एका पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की “गेल्या ३ महिन्यात आम्ही व्हायरल व्हिडीओ दाखवण्यासाठी काही बदल केले होते. फेसबुकवर लोकांनी जास्तीत जास्त काळ रहावं यासाठी आम्ही हे बदल करत होतो. या बदलामुळे जगभरातील फेसबुक वापरणाऱ्यांचा एका दिवसातील फेसबुकवर राहण्याचा वेळ ५ कोटी तासांनी कमी झाला आहे ”

हिंसक, दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामी करणाऱ्या पोस्टची वाढती संख्या हे फेसबुकवर होणाऱ्या टीकेतील मुख्य कारण आहे. यामुळे फेसबुकमध्ये काही बदल करण्यात येत आहे, खोट्या,खोडसाळ मजकुराला वेळीच आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी राजस्थानातील शंभूलालने एका मुसलमानाची हत्या करून त्याला जाळून मारल्याचा व्हिडीओही फेसबुकवर व्हायरल झाला होता. असे अनेक व्हिडिओ आहेत जे हिंसक स्वरूपाचे आहेत, अशा व्हिडीओंना आळा घालण्यासाठीही सध्या फेसबुकमध्ये काम सुरू आहे.