पोलीस चौकीत हॉटेल सुरू करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!

फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी, पुणे

लोणावळा येथील नारायणीधाम पोलीस चौकी नागरिकांकडून आर्थिक मदत घेऊन बांधण्यात आली. मात्र, तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या आशीर्वादाने चौकीच्या ठिकाणी बेकायदेशीर हॉटेल सुरू करण्यात आले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे प्रकाश पोरवाल यांनी केला.

दानशूर नागरिकांकडून लाखो रुपये घेऊन पोलीस चौकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, बांधकाम झालेली जागाच बनावट कागपत्रांच्या आधारे एका महिलेच्या नावावर लोणावळा नगरपरिषदेमध्ये नोंद करण्यात आली. पोलीस चौकी खासगी मालकीची असते का? असा सवाल करून पत्रकार परिषदेत पोरवाल म्हणाले, संबंधित हॉटेलला कुठल्याही खात्याची परवानगी घेण्यात आली नाही. तत्कालीन पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांच्या गैरकारभाराची तक्रार तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्याकडे केली. मात्र, त्यांनीही राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण यांना खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिली.

त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. दरम्यान, संबंधित सर्व दोषी नगरपरिषदेचे कर्मचारी व अधिकाNयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळण्यासाठी याचिका दाखल करणार असल्याचेही पोरवाल यांनी सांगितले.