ग्रामस्थ एकवटले, हक्काच्या नोकऱ्यांसाठी जेएसडब्ल्यूविरोधात प्रकल्पग्रस्तांची धडक

1

सामना प्रतिनिधी । पेण

वडखळच्या जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात आज हजारो शेतकऱ्यांनी एकवटत पेण तहसील कार्यालयावर धडक दिली. कवडीमोल भावाने जमिनी घेणाऱ्या कंपनीने आधी भूमिपुत्रांना नोकऱ्या द्याव्यात, मगच परप्रांतीयांना रोजगार द्यावा, अशा जोरदार घोषणा देत प्रकल्पग्रस्तांनी आसमंत दणाणून सोडला. इतकेच नाही तर आम्हाला न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही डोलवी, गडब, वडखळ व शहाबाज येथील गावकऱ्यांनी प्रशासनाला दिला.

पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये कामगार भरती करताना नेहमीच स्थानिकांना डावलून परप्रांतीयांची भरती करण्यात येते. याबाबत अनेकदा भूमिपुत्रांनी आवाज उठवूनही व्यवस्थापन त्याकडे दुर्लक्ष करते. संतापजनक म्हणजे या कंपनीमुळे परिसरात प्रदूषण वाढत असून खारबंदिस्तीचेही मोठे नुकसान होत आहे. खाडीतील बेकायदेशीर उत्खनन तसेच रसायनमिश्रित मातीच्या भरावाने नैसर्गिक नाले बंद झाले आहेत. त्यामुळे परिसराला पुराचा तडाखा बसत असल्याने दरवर्षी शेती उद्ध्वस्त होते. असे असताना प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहे. याविरोधात संतापाचा भडका उडालेल्या चार गावांतील ग्रामस्थांनी आज पेण तहसील कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले.

या आंदोलनात माजी रायगड जिल्हा परिषद सभापती सुरेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर, डोलवीच्या सरपंच वनिता म्हात्रे, परशुराम म्हात्रे, सतीश तरे, पंचायत समिती सदस्य राजेश मोकल, एम. डी. म्हात्रे, अनिल म्हात्रे, निलेश पाटील, अपर्णा कोठेकर, उपसरपंच नितीन पाटील, सुरेश माळी, सचिन तांबोळी, लक्ष्मण गावंड, योगेश पाटील व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार धैर्यशील पाटील व हरीष बेकावडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांना पाठिंबा दिला.

.. तर रस्त्यावर उतरू!
ग्रामस्थ संयमाने आंदोलन करत आहेत. आमच्या मागण्या मान्य करा. प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरून कंपनी व्यवस्थापनाला धडा शिकवू, असा इशारा डोलवीच्या सरपंच वनिता म्हात्रे यांनी दिला.