धुळीने उद्योगनगरीतील नागरिक बेजार

सामना प्रतिनिधी । पिंपरी

महापालिकेची सुरू असलेली विविध कामे, रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ आणि बदलते ऋतुमान यामुळे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शहराच्या मध्यवस्तीबरोबरच उपनगरांत धुळीचे साम्राज्य पसरले असून, अ‍ॅलर्जी होऊन नागरिकांना दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील वातावरण हल्ली पुण्यासारखे कधी उष्ण, कधी थंड, तर कधी मध्येच समशितोष्ण असे होत चालले आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही या औद्योगिकनगरीमध्ये वाढत चालली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेतर्फे विविध विकासकामांचा डोलाराच उभा केला जात असून, अनेक ठिकाणी उड्डाणपूल, रस्ते खोदाई, पाइपलाइन, ड्रेनेजलाइन टाकणे आदी काम सुरू आहेत. या साऱ्या गोष्टींचा विपरित परिणाम शहरातील वातावरणावर होत आहे. रस्ते तसेच रिकामी जमीन माती टिकवून ठेवत नसल्यामुळे शहरात धूळ उडताना दिसत आहे.

नागरिकांना याचा त्रास होत असून, दवाखान्यांमध्ये सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्यांनी त्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. निगडी, गावठाण, चिंचवड स्टेशन, चिंचवडगाव, पिंपरी चौक, पिंपरीगाव, कॅम्प, भोसरी गावठाण, पुणे नाशिक महामार्ग, पुणे-मुंबई जुना महामार्ग, तसेच दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी या अंतर्गत भागातील रस्त्यांवरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. येथील रस्त्यांवर धुळीचे लोट उडताना पाहायला मिळत आहेत. मोठमोठी मैदाने, क्रीडांगणे असणाऱ्या भागातही धूळ असून, या परिसरात हॉटेल, खाऊगल्ली आहेत. त्यामुळे तीच धूळ खाद्यपदार्थांवर बसून ती शरीरात जात आहे. त्यातूनच शरीरावर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अशा परिस्थितीत नागरिकांनी निरोगी राहण्यासाठी काही दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतल्यास धूळ व अ‍ॅलर्जीपासून बचाव करता येऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा वातावरणात मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खालावते. त्यामुळे घरामध्ये उब राहील याची काळजी घ्यावी, उबदार कपडे घालावेत. सर्दी, खोकल्यावर घरगुती उपचार करण्याची पद्धत अजूनही आहे. मात्र, तरीही लवकर बरे न वाटल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषधोपचार करावेत, असे विविध डॉक्टरांनी सांगितले.