‘संरक्षण किट’शिवाय फवारणी, तहसीलदारांनी पाठवल्या शेतकऱ्यांना नोटीसा

प्रसाद नायगांवकर, यवतमाळ

पुसद तालुक्याचे तहसीलदार डॉ.संजय गरकल यांनी ९ शेतकऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. संरक्षण किट न वापरता पिकांवर कीटकनाशके फवारल्याप्रकरणी या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. वणी तालुक्‍यातही एका शेतकऱ्याला तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे.

मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करत असताना २२ शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने काही उपाययोजना केल्या होत्या. या उपाययोजनांअंतर्गत शेतकऱ्यांना फवारणी करतेवेळी संरक्षण किट वापरणे बंधनकारक केले होते. तरीही हे किट न वापरता फवारणी केल्याने या नोटीसा पाठवण्यात आल्याचं तहसीलदारांनी सांगितले आहे.  गेल्या वर्षी फवारणी करताना विषबाधा झाल्याने ८० शेतकऱ्यांना रूग्‍णालयात दाखल करण्यात आले होते. यातील जवळपास २० शेतकऱ्यांवर अजूनही उपचार सुरू आहेत.