‘पेटा’ म्हणते मांसाहारी पदार्थांवर बंदीच घाला; ‘आयआयटी’ मुंबईचा मात्र स्पष्ट नकार

सामना प्रतिनिधी । मुंबई

पवई येथील ‘आयआयटी’ मुंबईतील शाकाहारी-मांसाहारी वाद मिटला असला तरी मांसाहारी खाद्यपदार्थांवर बंदीच घालावी अशी विनंती ‘पेटा’ या पशूप्रेमी संस्थेने आयआयटीला केली आहे, मात्र आयआयटी प्रशासनाने त्याला स्पष्ट नकार दिला आहे.

पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल्स (पेटा) ही प्राणीमित्र संस्था आहे. आयआयटी मुंबईमध्ये शाकाहारी-मांसाहारी हा वाद गेले काही दिवस सुरू होता. त्यावर पडदा पडला असला तरी ‘पेटा’ने मांसाहारी पदार्थांवर बंदीच घालावी अशी विनंती आयआयटीला केली. त्याला नकार देतानाच आयआयटी प्रशासनाने केवळ शिळे मांसाहारी पदार्थ ठेवण्यास काही ठरावीक कॅण्टीनना बंदी घातली गेली असल्याचे सांगितले आहे.

आयआयटी मुंबईत जगाच्या कानाकोपऱयातून विद्यार्थी आणि शिक्षक येतात. ते वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेले असतात. त्यांच्या संस्कृतीचा आदर राखलाच पाहिजे. त्यामुळे हिंदुस्थानसारख्या लोकशाही देशात काय खावे आणि काय खाऊ नये याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे असे आयआयटी मुंबईच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.