‘मुलींना पळवून आणण्यात मदत करतो’ म्हणणाऱ्या राम कदमांविरोधात याचिका

1

सामना ऑनलाईन, मुंबई

तुमच्या पसंतीची मुलगी सांगा, पळवून आणणार आणि देणार असे महिलांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्या अडचणी वाढणार आहेत. आमदार राम कदम यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली असतानाच पुण्यातील महिलांनी त्यांच्या या बडबडीचा निषेध नोंदवत हायकोर्टात धाव घेतली आहे. महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या  भाजप आमदार राम कदम यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 21 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

आमदार राम कदम यांच्यावर सोनाली बेंद्रेचे पती भडकले, वाचा सविस्तर

गेल्याच आठवडय़ात पार पडलेल्या दहीहंडी महोत्सवात भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबाबत बेताल बडबड केली होती. तुम्ही मला कोणत्याही कामासाठी भेटू शकता. जर तुम्ही एखाद्या मुलीला प्रपोज केलेत आणि ती नाही म्हणाली तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार असे वक्तव्य केले होते.

राम कदमांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीच्या डायलॉगसाठी केला गोविंदांचा अपमान

राम कदम यांच्या या विधानावर  राज्यभरातून टीका करण्यात आली. याप्रकरणी राष्ट्रवादी पुणे शहर महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर हायकोर्टात 21 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.