परमबीर सिंह यांच्याविरुद्ध याचिका

सामना ऑनलाईन । मुंबई

भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणातील शहरी माओवाद्यांचे कश्मीर आणि मणिपूरमधील फुटीरवाद्यांबरोबर घनिष्ठ संबंध असल्याबाबतची माहिती पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्ध करणारे अप्पर पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांनी चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळल्याने त्यांच्याविरुद्ध बडतर्फीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव यांनी एका याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 भीमा-कोरेगाव दंगलीत नक्षलवादी आणि शहरी माओवाद्यांकडून आर्थिक मदत केली गेल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी गेल्या आठवडय़ात देशभरात छापे टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींना अटक न करता नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर अप्पर पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी याप्रकरणी गेल्या आठवडय़ात पत्रकार परिषद घेत संशयितांचे कश्मीर तसेच मणिपूरमधील माओवाद्यांशी कनेक्शन असल्याची माहिती दिली व या प्रकरणातील तपासाची कागदपत्रे पत्रकार परिषदेत जाहीर केली. या कागदपत्रांचा पोलिसांना पुरावा म्हणून उपयोग झाला असता. मात्र अप्पर पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत तपासात सापडलेली कागदपत्रे जाहीर केल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव यांनी हायकोर्टात आज याचिका दाखल केली. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळल्याने कलम 311 अन्वये त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.