पेट्रोल ८० रूपये लिटर झालं, वाहनचालक दर बघून हादरले

सामना ऑनलाईन,मुंबई

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकायला सुरुवात झाल्याने हिंदुस्थानातील पेट्रोलचे दरही वाढायला लागले आहेत. सोमवारी पेट्रोल ८०.१० रूपये लिटर या दराने विकलं जात होतं. रविवारी हा दर ७९.५५ रूपये इतका होता. १९ जानेवारीला ६६.५ रूपये लिटर या दराने विकलं जाणारं डिझेल सोमवारी जवळपास एक रूपयाने महागलं होतं, मुंबईमध्ये २२ जानेवारीला डिझेल ६७.१० रूपये लिटर दराने विकलं जात होतं.

वाढत्या किंमतींमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर हे धडकी भरवणारे ठरायला लागले आहेत. पेट्रोलचे भाव १०० रूपये लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. महागाई कमी झाल्याच्या केंद्र सरकारचे दावे इंधनाच्या वाढत्या दरांमध्ये जळून खाक झाल्याचं चित्र सध्या देशात आहे. यामुळे इंधनांचाही जीएसटीत समावेश केला जावा अशी सातत्याने मागणी केली जात आहे.

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधने जीएसटीत समाविष्ट केली जावीत यासाठी आपलं सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचं सांगितलंय. लवकरच होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊ शकते असं त्यांनी सांगितलं आहे. जीएसटीमध्ये इंधनांचा समावेश केला तर पेट्रोल-डिझेलचे दर ५० रूपयांपर्यंत उतरू शकतात असं सांगितलं जात आहे. मात्र असं झाल्यास राज्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो कारण पेट्रोल-डिझेलवरील विविध करांमुळे राज्यांना महसूल मिळत असतो. जीएसटी लागल्यास महसूल घटण्याची शक्यता असल्याने राज्य सरकार इंधने जीएसटीत अंतर्भूत करण्यास राजी होत नाहीयेत.