पेट्रोलच्या किंमतीवर लक्ष आहे का ? वाचा, आज किती आहे किंमत

सामना ऑनलाईन, मुंबई

इंधनाचे दर पुन्हा भडकायला सुरुवात झाली असून महाराष्ट्रात पेट्रोलने पुन्हा एकदा 80 रूपये प्रति लिटरचा आकडा गाठला आहे. राज्यातलं सगळ्यात महाग पेट्रोल हे सध्या परभणीमध्ये मिळत असून तिथे सोमवारी प्रति लिटर 80.09 रुपये दराने विकले जात आहे. सहा महिन्यांपूर्वी इथे पेट्रोल 90 रूपये लिटर दराने विकले जात होते. हे आकडे पाहिल्यानंतर सामान्य माणसाला धडकी भरायला लागली आहे. पेट्रोल पुन्हा नव्वदी गाठते की काय भीती त्यांना वाटायला लागली आहे. पेट्रोल प्रमाणेच इथे डिझेलचेही दर वाढले असून ते परभणीत 71.47 रूपये लिटर दराने विकले जात आहे.

मुंबईबाबत बोलायचं झालं तर सोमवारी इथे पेट्रोल 78.06 रूपये प्रति लिटर या दराने विकले जात होते. मुंबईतला डिझेलचा दर सोमवारी 70.63 रूपये प्रति लिटर इतका होता. नांदेडमध्ये रविवारी पेट्रोलचा दर हा 79.89 रूपये प्रति लिटर इतका होता तर नंदूरबार इथे रविवारी पेट्रोलचा दर लिटरमागे 79.27 रूपये इतका होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. रूपयाची सुरू असलेली घसरण ही देखील इंदन दरवाढीला कारणीभूत असल्याचंही सांगितलं जात आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दराने उच्चांक मोदी सरकारच्या काळात 4 ऑक्टोबर 2018 ला गाठला होता. त्या दिवशी पेट्रोलचा दर हा 91.34 रूपये इतका होता. याच दिवशी डिझेलचा दर हा 80.10 रूपये प्रति लिटर इतका होता.

इंदन दरवाढीचा भडका उडाल्यानंतर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून इंधनावरील करांमध्ये 4.37 रूपये प्रति लिटर इतकी कपात केली होती. यामुळे 5 ऑक्टोबरला पेट्रोलचे दर 86.97 रूपये प्रति लिटरपर्यंत खाली आले होते. काही दिवसांतच हे दर पुन्हा भडकले आणि 88.18 रूपये इतके झाले. त्यानंतर हे दर खाली यायला सुरुवात झाली होती. 7 जानेवारी 2019 रोजी हे दर 73.95 रूपये प्रति लिटर इतके खाली आले होते.