जनतेचा खिसा कापून सरकारने तिजोरी भरली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदूंच्या सण-उत्सवांच्या काळात पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका उडाला असताना जनतेला दिलासा देण्याऐवजी यामागे आंतरराष्ट्रीय कारणे जबाबदार असल्याचे सरकार सांगत आहे. वास्तविक या दरवाढीमागे मोदी सरकारच जबाबदार आहे. भरमसाट अबकारी शुल्क वसुलीतून केंद्राच्या तिजोरीत 229019 कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे जनतेचा खिसा कापून सरकार तिजोरी भरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

निवडणुकीच्या तोंडावर किंचित कपात होईल
पेट्रोल, डिझेलची दरवाढ दिवाळीपर्यंत कायम राहील. त्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थानसह 4 राज्यांत विधानसभा निवडणुका होतील. त्यावेळी केंद्र सरकार पेट्रोल, डिझेलच्या दरात किंचित कपात करेल. पेट्रोलचे दर 90 वरून 85 रुपयांपर्यंत खाली येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

परभणीत नव्वदी गाठली
– शनिवारी पेट्रोल 39 पैसे तर डिझेल 44 पैशांनी महागले. 15 ऑगस्टपासून रोजच दरवाढ होत असल्याने गेल्या 25 दिवसांत पेट्रोल 3.24 रुपये आणि डिझेल 3.74 रुपयांनी महागले आहे.

– महाराष्ट्रात सर्वाधिक दर परभणीत आहेत. परभणीत पेट्रोल 89.57 रुपये, तर डिझेल 77.53 रुपयांवर गेले आहे. त्याखालोखाल अमरावतीत पेट्रोल 89.03 रुपये, सोलापूर आणि संभाजीनगरात 88.82 रुपये पेट्रोल झाले आहे. मुंबईत पेट्रोल 87.77 रुपये, डिझेल 76.98 रुपये, पुण्यात पेट्रोल 87.57 रुपये आणि डिझेल 75.60 रुपयांवर गेले आहे.

– डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ यामुळे पेट्रोल, डिझेल दरवाढ होत असल्याचे कारण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतेच दिले आहे. वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अल्यानंतर गेल्या चार वर्षांत एकदाही कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर्स प्रतिबॅरलवर गेलेल्या नाहीत. शनिवारी कच्च्या तेलाच्या किमती 77 डॉलर प्रतिबॅरल होत्या.

भरमसाट करवसुली
– केंद्र सरकारकडून प्रतिलिटर पेट्रोलवर 19.48 रुपये आणि डिझेलवर 15.33 रुपये अबकारी शुल्क वसूल केला जातो.
– केंद्रात मोदी सरकार आल्यापासून 2014 ते नोव्हेंबर 2016 पर्यंत तब्बल नऊ वेळा अबकारी शुल्कात वाढ करण्यात आली. पेट्रोलवर 11.66 रुपये आणि डिझेलवर 13.47 रुपये अबकारी शुल्क वाढविले. केवळ एकदा ऑक्टोबर 2016 ला 2 रुपयांनी अबकारी शुल्कात कपात केली.
– अबकारी शुल्काव्यतिरिक्त राज्यांकडून व्हॅट लावला जातो.
– पेट्रोलवर सर्वाधिक 29.12 टक्के व्हॅट मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रात लावला जातो. दिल्लीत हा व्हॅट 27 टक्के आहे.
– पेट्रोल, डिझेलवरील अबकारी करापोटी 2014-15 मध्ये केंद्र सरकारला 99,184 कोटी रुपये मिळाले होते. मोदी सरकारने करवाढ केल्यानंतर अबकारी शुल्कापोटी सरकारला दुपटीपेक्षा जास्त 2017-18 मध्ये तब्बल 2,29,019 कोटी रुपये मिळाले.
– राज्यांना व्हॅटमुळे मिळणाऱया उत्पन्नातही वाढ झाली. 2014-15 मध्ये 1,37,157 कोटी रुपये जमा झाले होते. 2017-18 मध्ये 1,84,091 कोटी रुपये मिळाले.