पेट्रोल-डिझेलचा दर भडका, कर्नाटक विजयाची भाजपकडून जनतेला भेट

सामना ऑनलाईन । मुंबई

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान स्थिरावलेले पेट्रोल-डिझेलचे भाव निवडणूक संपताच वधारले आहेत. मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यास सुरुवात केली. आज पेट्रोलचा दर ८२.९४ रु. प्रति लिटर तर डिझेलचा दर ७०.८८ रु. प्रति लिटर इतका झाला आहे. यामुळे देशातील जनता भडकली असून ही कर्नाटकातील भाजपच्या विजयाची भेट असल्याच्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा दुहेरी फटका

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच पेट्रोल- डिझेलच्या किंमतींना ब्रेक लावण्यात आला होता असं आकडेच सांगतात. पण निवडणुका संपताच पुन्हा एकदा इंधनाच्या किंमती वेगाने वाढल्या आहेत. दरम्यान २०१६ नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम हिंदुस्थानमधील पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर होणार आहे. गेल्या १९ दिवसांपासून पेट्रोल किंमत मुंबईत ८२.४८ प्रति लिटर होती. पण सोमवारी त्यात १७ पैशांनी वाढ करण्यात आली. तर डिझेलसाठी ७०.२० रुपये एक लीटरसाठी मोजावे लागत होते. पण कर्नाटक विधानसभेसाठीचे मतदान संपताच यात २३ पैशांची वाढ करण्यात आली.

पाहा कर्नाटक निवडणुकीचे मतदान होईपर्यंत दर कसे स्थीर होते…

petrol-price diesel-price

वरील आकडेवारी निवडणुकीसाठी करण्यात आलेला ‘गोलमाल’ स्पष्ट दाखवत आहे. हेच का अच्छे दिन? असा प्रश्न जनता विचारू लागली आहे. यूपीएच्या काळात पेट्रोल-डिझेलचा दर इतका झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया देणारी भाजप सत्तेत आल्यानंतर पहिले वर्ष आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले. त्यामुळे किमती कमी होत्या, त्याचं श्रेय मोदी सरकारनं लाटलं. पण गेल्या सहा महिन्यात हा दर सुमारे १० रुपयांनी वाढला आहे. त्याला रोखण्यासाठी मोदी सरकार काहीच का करत नाही असे सवाल देखील केले जात आहेत.