सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

नव्वदी पार केलेल्या पेट्रोलची दरवाढ शतकाच्या उंबरठय़ावर येउैन ठेपली आहे. ज्या वेगाने रोज दरवाढ होत आहे ते पाहता पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपये असा ‘महाविक्रम’ करण्याची दाट शक्यता आहे. डिझेलही दरवाढीच्या शर्यतीत असून याच आठवडय़ात 80 रुपये होण्याची भीती आहे. दरम्यान, सणासुदीच्या दिवसांत जनता मात्र महागाईने त्रस्त आहे.

मंगळवारी पेट्रोल 14 पैशांनी, तर डिझेल 15 पैशांनी महागले. 15 ऑगस्टपासून पेट्रोलच्या दरांमध्ये 3.79 रुपये तर डिझेल 4.20 रुपयांनी महागले आहे. महाराष्ट्रात सर्व शहरांमध्ये पेट्रोल 89 रुपयांवर गेले आहे. परभणीत पेट्रोलने नव्वदी पार केली. ही दरवाढ रोखणे सरकारच्या हातात नाही असे केंद्र सरकारने कालच स्पष्ट केल्यामुळे लवकरच पेट्रोल शतक पार करणार अशी दाट शक्यता आहे.

परभणी ‘टॉप’वर

सर्वाधिक पेट्रोल दरवाढीत परभणीने राज्यात उच्चांक गाठला आहे. मंगळवारी परभणीत पेट्रोल 90.05 रुपये प्रतिलिटर होते. राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील पेट्रोलचा दर मुंबई 88.26 रुपये, पुणे 88.05 रुपये, नाशिक 88.63 रुपये, अमरावती 89.51 रुपये, नांदेड 89.84 रुपये, नंदुरबार 88.94 रुपये.

दरवाढीविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांनी याचिका दाखल करून घेतली असून, यावर उद्या सुनावणी होणार आहे. पेट्रोल, डिझेल या अत्यावश्यक वस्तू आहेत. त्यामुळे इंधनाचे दर निश्चित हवेत. रोज दरवाढ नको. केंद्र सरकारकडून दिशाभूल केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना सरकारकडून मात्र जनतेला दिलासा दिला जात नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

डिझेल दरवाढीमुळे महागाईचा भडका

डिझेलही दरवाढीच्या स्पर्धेत उतरले आहे. आज मुंबईत डिझेल 77.47 रुपये, पुण्यात 76.46 रुपये, परभणीत 78 रुपये झाले आहे. डिझेल लवकरच 80 रुपये प्रतिलिटर होईल. डिझेल दरवाढीचा थेट परिणाम मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक महागण्यावर होतो. त्यामुळे गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सणासुदीच्या दिवसांत महागाईचा भडका आणखी उडणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये एक रुपया दरकपात

पश्चिम बंगाल सरकारने पेट्रोल, डिझेलवरील व्हॅटवर एक रुपयाने कपात केली. तसेच काल आंध्र प्रदेश सरकारने 2 रुपये व्हॅट कमी केला होता.

पेट्रोल, डिझेल खरेदीवर बाईक, एसी, मोबाईल फ्री

पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले असताना मध्य प्रदेश सरकारने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नामी शक्कल लढविली आहे. मध्य प्रदेशात डिझेलवर 22 टक्के, तर पेट्रोलवर 27 टक्के व्हॅट आकारला जातो. मालवाहतूकदार सीमेवरील राज्यांत डिझेल खरेदी करीत असल्यामुळे पेट्रोलपंपचालकांनी बंपर ऑफर दिली आहे. शंभर लिटर डिझेल भरल्यास चहा, नाश्ता मोफत, 5 हजार लिटर डिझेल खरेदीवर मोबाईल, सायकल किंवा मनगटी घडय़ाळ, 15 हजार लिटर खरेदीवर कपाट, सोफासेट, 25 हजार लिटर डिझेल खरेदी केल्यास वॉशिंग मशीन, 50 हजार लिटर डिझेल खरेदीवर एसी, 1 लाख लिटर खरेदी केल्यास स्कूटर किंवा मोटारसायकल मोफत दिली जात आहे.