स्लो पॉयझन ७९ रूपये प्रति लिटर

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्यातील वाहनचालक आणि खासकरून बाईकस्वार एका अदृश्य महागाईशी रोज लढताना दिसतायत. ही लढाई आहे वाढत्या पेट्रोलच्या दरांशी. काही आठवड्यांपूर्वी ७० ते ७२ रूपयांच्या आसपास असलेलं पेट्रोल अचानक ८० रूपयांपर्यंत पोहोचलं आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पेट्रोल हे कमीत कमी ७८ ते ७९ रूपये लिटर दराने विकलं जात आहे. एक काळ असा होता जेव्हा सध्या सत्तेत असलेली भाजपा पेट्रोलच्या दरात वाढ झाली की रस्त्यावर उतरायची, देशव्यापी आंदोलनं करायची. मात्र सत्तेत गेल्यानंतर हीच भाजपा दरवाढीवर थंड बसलेली बघायला मिळतेय.

केंद्र सरकारने इंधनाचे दर रोज बदलतील असं जाहीर केलं होतं. या निर्णयानंतर फार थोडेवेळा पेट्रोलच्या किंमती जवळपास ३ रूपयांनी कमी झाल्या होत्या. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून पेट्रोलच्या किंमतींनी जे बाळसं धरायला सुरुवात केलंय ते बघितल्यानंतर ग्राहकांना आकडी येण्याची वेळ आली आहे. रोज किंमती बदलत असल्याने पेट्रोलपंपावर गेल्याशिवाय वाहनचालकांना किंमतीचा अंदाज येत नाही. पेट्रोलपंपावर पोहोचल्यानंतर मिळेल त्या किंमतीत पेट्रोल भरण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. त्यामुळे पेट्रोलची ही दरवाढ स्लो पॉयझन प्रमाणे आहे, जी वाहनचालकांची तिजोरी हळूहळू रिकामी करत चालली
आहे.

आज राज्यातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर अशा पद्धतीने आहेत

 • यवतमाळ-७९.८२/-
 • रत्नागिरी-७९.८१/-
 • संभाजीनगर-७९.७८/-
 • सोलापूर-७९.३७/-
 • नागपूर-७९.३१/-
 • नाशिक-७९.२१/-
 • कोल्हापूर-७९.०३/-
 • ठाणे-७९.०३/-
 • नवी मुंबई-७८.९३
 • मुंबई-७८.८२ /-
 • पुणे-७८.६७/-