फिल सिमन्स अफगाणिस्तानचे नवे प्रशिक्षक

सामना ऑनलाईन । काबूल

आयसीसीकडून कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाल्यानंतर नवोदित अफगाणिस्तानच्या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दृष्टीने गंभीरपणे पावले टाकायला सुरुवात केली आहे. वेस्ट इंडीजचे माजी खेळाडू फिल सिमन्स यांची २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत अफगाणिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. याआधी फिल सिमन्स यांनी वेस्ट इंडीज, झिम्बाब्वे आणि आयर्लंडच्या संघाला प्रशिक्षण दिलेले आहे. हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू लालचंद राजपूत यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांना मुदतवाढ नाकारली. यानंतर बोर्डाने फिल सिमन्स यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. सिमन्स ८ जानेवारीपासून आपल्या पदाचा कार्यभार सांभाळतील. सिमन्स आगामी वर्षात महत्वाच्या स्पर्धा लक्षात घेता आमच्या संघात चांगले बदल घडवू शकतील असा आम्हाला विश्वास आहे. याच कारणांसाठी त्यांच्यावर प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात येत असल्याचे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शफीक यांनी सांगितले.