व्हॉट्सअॅपच्या बदलत्या रंगात फसू नका…

सामना ऑनलाईन । मुंबई

तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅपचा रंग बदलायचा आहे का? तुमचं उत्तर जर हो असेल, तर थांबा.. असं करू नका.. सध्या व्हॉट्सअॅपचा रंग बदलण्यासाठीच्या प्रश्नाचं लिंकरूपी आमंत्रण व्हायरल होत आहे. काही जण ‘बघू तरी काय होतं?’ या उत्साहात त्या लिंकवर क्लिक सुद्धा करायला जातील. मात्र, अशा प्रकारे येणारी सोशल आमंत्रणं ही प्रत्यक्षातही ‘रंगबदलू’ असू शकतात. या आमंत्रणाचा स्वीकार केला तर तुमची खासगी माहिती हॅक होऊ शकते.

व्हॉट्सअॅपचा रंग बदलून देणारी एक लिंक सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. त्या लिंकमध्ये दिलेला व्हॉट्सअॅपचा लोगो हा निळा असतो. त्यामुळे अनेक जण गंमत म्हणून ही लिंक क्लिक करतात. त्यानंतर तुमचा नंबर व्हेरिफाय केला जातो. त्या प्रक्रियेत तुम्हाला ती संबंधित लिंक १२ जणांना किंवा सात ग्रुप्सना पाठवावी लागते. त्यानंतर लिंकला अॅक्टिव्हेट करण्यासाठी सांगितलं जातं. त्यानंतर लगेच एक संदेश येतो की तुमचं हे निळं व्हॉट्सअॅप फक्त डेस्कटॉपर अॅप्लिकेशनसाठी आहे. विशेष म्हणजे ही लिंक फक्त मोबाईलवरच उघडते. या प्रकाराला सायबर जगतात फिशिंग म्हटलं जातं. अशा लिंक्सना तुमच्या मोबाईलमध्ये पाठवण्याचा उद्देश फक्त खासगी माहिती हॅक करणं हाच असतो.

कशा ओळखाल या खोट्या लिंक्स-
या लिंक्सचे वेब अॅड्रेस नीट पडताळून घ्या. लिंकपुढे ओआरजी असणं ही त्या लिंकची विश्वासार्हता असू शकत नाही.
एखादी लिंक चुकीची असल्याचा संशय आल्यास त्या लिंकवर क्लिक करू नका.
अमूक एखादी लिंक काही लोकांना पाठवा अशा प्रकारचा संदेश आल्यास सावध राहा.