फोनच्या चार्जरमुळे संपूर्ण घर आगीत भस्मसात

1

सामना ऑनलाईन । लंडन

मोबाईल फोन चार्ज केल्यानंतर अनेकांना विजेचं बटन बंद करायची सवय नसते. त्यामुळे फोन काढून घेतला तरीही चार्जरमध्ये विद्युतप्रवाह सुरू राहतो. अनेक जण ही सवय निरुपद्रवी आहे असं समजून बटन बंद करायचे कष्ट घेत नाहीत. पण, या सवयीचा खूप मोठा फटका एका माणसाला बसला आहे. विद्युतप्रवाह सुरू असलेल्या चार्जरने पेट घेतल्यामुळे त्याचं संपूर्ण घर जळून भस्मसात झालं आहे.

युनायटेड किंग्डममधील वेल्स देशातल्या एबेरफॅन गावात ही घटना घडली आहे. एलिस मॅथ्यूज नामक एका माणसाच्या घरात १३ मार्च रोजी अचानक आग लागली. आग इतकी भयंकर होती की त्यामुळे त्याचं सगळं घर काही क्षणात खाक झालं. जेव्हा या आगीचा शोध घेतला गेला तेव्हा, ही आग चार्जरमधील विद्युत प्रवाहामुळे लागल्याचं समोर आलं. विद्युत प्रवाह सुरू राहिल्यामुळे चार्जरने गरम होऊन पेट घेतला आणि हाहा म्हणता संपूर्ण घर पेटलं.

एलिसच्या घरात त्यावेळी सुदैवाने कुणीही नव्हतं. तो, त्याची बहीण आणि भाचा त्यावेळी कामानिमित्त बाहेर होते. ही घटना घडायच्या काही वेळाआधीच त्याची बहीण घर बंद करून कामासाठी बाहेर पडली होती. संपूर्ण घर जळल्यामुळे सध्या एलिस तात्पुरत्या घराच्या शोधात आहे.