बोलका


धनेश पाटील ,[email protected]

गेल्या दशकभरात मराठी आणि हिंदी सिने-मालिका सृष्टीवर आपली वेगळी छाप पाडत अल्पावधीतच आपला देशा-विदेशात चाहता वर्ग निर्माण केलेली गुणी अभिनेत्री म्हणून शिवानी सुर्वेचं नाव घेतलं जातं. ‘देवयानी’ या नावाने महाराष्ट्राच्या घराघरात परिचयाची असलेल्या शिवानीचे 2019 या नव्या वर्षात दोन मराठी सिनेमे येऊ घातले आहेत. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी बालकलाकार म्हणून रंगभूमीवर पदार्पण केलेल्या शिवानीचा हा रंगभूमी ते छोटा पडदा आणि रुपेरी पडदा असा प्रवास थक्क करणारा असाच आहे.

2014 साली शिवानीचे फोटो काढण्याची मला संधी मिळाली. शिवानी तेव्हा ‘देवयानी’ याच नावाने सर्वत्र प्रसिद्ध होती. शिवानीने 2005-06 साली ‘मांगल्याचं लेणं’ या नाटकातून पदार्पण केलं. त्यानंतर तिने इतर प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांत कामदेखील केलं. तर 2011 साली हिंदी मालिकेतून तिने छोटय़ा पडद्यावरून अभिनयाचा श्रीगणेशा केला होता. मात्र, 2012 साली स्टार प्रवाह चॅनलवर ‘देवयानी’ या मालिकेत तिने मध्यवर्ती भूमिका साकारली होती. याच भूमिकेने तिला खरा चेहरा मिळवून दिला.

याच देवयानीचे फोटोशूट मी करत होतो. पारंपरिक वेशभूषेतलं हे शूट होतं. शिवानीसाठी राखाडी रंगाची साडी माझ्या स्टायलिस्टने निवडली होती. साडय़ांमध्ये राखाडी रंगात फार कमी विविधता मिळते आणि म्हणूनच हा रंग आणि तिचा एकूण लूक हा शूट करण्यापूर्वी त्यावेळी विशेष अभ्यासकरून निवडण्यात आला होता. त्यादिवशी एकाच दिवशी तीन अभिनेत्रींचं शूट मला करायचं होतं. सकाळी सातच्या सुमारास मी आणि माझी टीम स्टुडिओला पोहचलो. आठ वाजताच्या सुमारास सगळ्यात आधी ऋता दुर्गुळे हिचे शूट तर यानंतर सकाळी 11 च्या सुमारास सई रानडे हिचे शूट नियोजित केलं होतं. शिवानीला दुपारी दोनची वेळ निश्चित करण्यात आली होती.

शिवानी स्टुडिओत वेळेत आली. राखाडी रंगाची पारंपरिक साडी, गळ्यात कलाकुसर केलेलं नक्षीदार दागिना, हातात बांगडय़ा, कपाळावर अर्ध चंद्रकोर टिकली असा मराठमोळा पेहराव शिवानीचा तेव्हा शूटसाठी साकारला होता. यात शिवानीचं सौंदर्य, ‘चेहऱयावरचा तजेलपणा हा अधिकच उठून दिसत होता. या मराठमोळ्या पेहरावात फोटोशूट केल्यानंतर यानंतर लगेचच शिवानीच एका मॅगझिनच्या कव्हरफोटोसाठीचं फोटोशूट आम्हाला करायचं होतं.

वृत्तपत्र आणि मॅगझिन या दोहोंची फोटोसाठीची गरज वेगळी होती आणि म्हणूनच शिवानीचा मेकओव्हर करावा लागणार होता. पहिलं फोटोशूट झाल्यानंतर आम्ही मध्ये ब्रेक घेतला आणि नंतर पुढच्या फोटोशूटला सुरवात केली. शिवानीचा मेकओव्हर करण्यात आला. शिवीनीसाठी लाल रंगाचा लॉंग गाऊन निवडण्यात आला होता. या कॉस्च्युममध्ये तिचे वेगवेगळ्या लाईटिंगमधले फोटो मी कॅमेराबद्ध केले. साधारण चार ते पाच तास अखंड शिवानीचं या दोन वेगळ्या लूकमधलं फोटोशूट त्यावेळी मी केलं.

शिवानीचं जन्मगाव चिपळूण. त्यानंतर काहीकाळ ती डोंबिवली आणि मुंबईत सायन येथे स्थायिक झाली. इथेच तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. आता ती वडाळा येथे स्थायिक झाली. शिवानी सुमारे सात – आठ वर्षांची होती. तेव्हा तिच्या आईसोबत ती एका एक्झिबिशनच्या कामा संदर्भात मनोहर नरे यांना भेटली. मनोहर नरे यांनी शिवनीतला कलाकार हेरला आणि तिला नृत्य येतं का? असं तिच्या आईला विचारलं. शिवानी तेव्हा भरतनाटय़म शिकत होती. त्यामुळे तिला नृत्याची चांगली जाण होती. याच भेटीनंतर नरे यांच्यामुळे शिवानीला ‘मांगल्याचं लेणं’ या नाटकात बालकलाकार म्हणून संधी मिळाली. संधीच सोनं करत शिवानीने या नाटकाच्या तब्बल 250 हुन अधिक प्रयोगात आपला अभिनय सादर केला. यानंतर शिवानी एका नाटकासंबंधित काम करत असलेल्या ग्रुपसोबत जोडली गेली. पुढे काही काळ रंगभूमीवर प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही नाटकांत तिने काम केलं. साधारण तेरा वर्षांची असताना शिवानीने ‘अगले जनम’ या हिंदी मालिकेतून छोटय़ा पडद्यावर पदार्पण केलं. यानंतर ‘फुलवा’, ‘नव्या’ या हिंदी मालिकेत तिने माहितीच्या भूमिका साकारल्या. हिंदीचा तगडा अनुभव पाठीशी असलेल्या शिवानीने 2012 साली मराठी छोटय़ा पडद्यावर आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केला तो स्टार प्रवाह चॅनलच्या ‘देवयानी’ या मालिकेतून. ही मालिका तुफान गाजली आणि देवयानी अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात बघता बघता पोहचली. यानंतर ‘अनामिका’, ‘जाना ना दिलसे दूर’, ‘एक दिवाना था’, ‘लाल इष्क’ या हिंदी तर ‘सुंदर माझं घर’, ‘तू जीवाला गुंतवावे’, या मराठी मालिकांतून तिने आपला दमदार अभिनय सादर करत आपल्या यशाचा आलेख नेहमी चढता राखला.

रंगभूमी आणि मालिका अशा दोन्ही क्षेत्रांत आपलं वेगळं नाव कमावलेल्या शिवानीचे दोन आगामी सिनेमे येत्या वर्षात येऊ घातले आहेत. यातील एका सिनेमात ती अंकुश चौधरीसोबत दिसणार असून या सिनेमातली तिची भूमिका ही तिच्यासाठी खास असल्याचं ती सांगते.