पिकासो नावाचं गारूड

जिवंतपणीच दंतकथेचं माहात्म्य लाभलेल्या पिकासोचं नाव ऐकलेलं नाही असा सुशिक्षित माणूस सहसा आढळून येत नाही. चित्रकलेतलं काही कळत असो अथवा नसो, ‘मॉडर्न आर्ट’ आणि ‘पिकासो’ हे शब्द बरेच लोक समानार्थानं वापरताना आढळतात. त्यात पुन्हा पिकासोविषयीच्या अत्यंत टोकाच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य माणसांना बुचकळय़ात पाडतात. तात्पर्य काय, तर पिकासोला जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही अफाट प्रसिद्धी मिळाली. असं म्हणतात की, त्यानं वस्तू खरेदी केल्यानंतर दिलेला चेक दुकानदार बँकेत वटवायचे नाहीत… कारण त्या रकमेपेक्षा जास्त पैसे लोक त्याच्या सहीसाठी द्यायला तयार असायचे.

अर्थात सर्वसामान्य लोकांना असल्या किश्श्यांच्या जोडीला पिकासोच्या आयुष्यात आलेल्या असंख्य बायका, त्याला अडुसष्टाव्या वर्षी झालेली मुलगी आणि सत्तराव्या वर्षी त्यानं केलेलं लग्न, त्याची अफाट संपत्ती आणि त्याचं कम्युनिस्ट पक्षाचं सदस्यत्व, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीवरून वारसदारांमध्ये झालेली भांडणं अशा गोष्टींवरच बोलायला आवडतं. सर्वसामान्य लोकांना पिकासोचा क्युबिझम तर कळत नाहीच; पण वास्तववादापासून फारकत घेणारी आणि विध्वंसक, स्फोटक अशी त्याची चित्रं पाहायलासुद्धा आवडत नाहीत. एक गोष्ट मात्र अगदी खरी होती, पिकासोनं कधीही कोणाचीही फिकीर केली नाही. तो त्याच्या मस्तीत आणि धुंदीत त्याला हवं तसं जगला.

चित्रकार शब्द उच्चारल्यावर जे एक भणंग, उपेक्षित, दरिद्री आणि कळकट चित्र डोळय़ांसमोर उभं राहतं, त्या साच्यात अजिबात न बसणारं, किंबहुना दुसऱया टोकाचं आयुष्य पिकासो जगला. २५ ऑक्टोबर १८८१ रोजी मलिगा, स्पेन इथं जन्मलेल्या पिकासोचा मृत्यू ८ एप्रिल १९७३ या दिवशी फ्रान्समधील मूजँस या गावी झाला. म्हणजे पिकासो तब्बल ब्याण्णव वर्षांचं आरोग्यपूर्ण, समृद्ध आणि श्रीमंत आयुष्य जगला. व्हॅन गॉगसारखा तो अल्पायुषी नव्हता. पॉल गोगँसारखं कलंदर आणि भणंग आयुष्य त्याच्या वाटय़ाला आलं नव्हतं. तुळुज लोत्रेकसारखा उपेक्षेमुळे अथवा प्रेमभंगामुळं त्याच्या डोक्यावर परिणामही झाला नव्हता.

वडील डॉन जोझे रुईस बास्को आणि आई डॉना मारिया लोपेझ पिकासो यांच्या पोटी पाब्लो पिकासोचा जन्म झाला. असं म्हणतात की, मृत मूल जन्माला आलंय असं समजून सुईणीनं त्याच्याकडं पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. सिगार ओढणाऱया डॉक्टरकाकांनी त्याच्या तोंडावर धूर सोडला आणि हा मोठय़ा आवाजात रडला होता म्हणे. अनेक संत-नातेवाईक यांचं स्मरण करून भलं मोठं असं बावीस शब्दांचं नाव याला ठेवलं होतं- अर्थात चित्राच्या खाली स्वाक्षरी करताना त्यानं आईकडून आलेलं ‘पिकासो’ एवढंच नाव स्वीकारलं होतं. चित्रकला शिक्षक असलेल्या त्याच्या वडिलांचे गुण आणि चित्रकला प्रेम त्याच्या रक्तातच होतं, असं म्हणतात की, त्यानं पहिला शब्द उच्चारला तो ‘लिझ’, ज्याचा स्पॅनिश भाषेत अर्थ होतो पेन्सिल! वयाच्या सातव्या वर्षी वडिलांनी त्याला चित्रकलेचं औपचारिक शिक्षण द्यायला सुरुवात केली. पाब्लोची चित्रकलेतील प्रगती वेगानं होत होती. स्पेनच्या सांस्कृतिक राजधानीत-बार्सिलोनामध्ये चित्रकलेचं प्राथमिक शिक्षण घेऊन विसाव्या वर्षी पाब्लो चित्रकलेच्या विश्वावर आक्रमण करण्यासाठी कलेच्या राजधानीत- पॅरिस येथे आला.

सुरुवातीच्या काळात वास्तववादी शैलीत चित्रं काढणाऱया पिकासोनं त्याच्या प्रदीर्घ चित्रकारकीर्दीत अनेक नवनवीन प्रयोग केले. चित्रकलेच्या क्षेत्रातील परंपरागत संकेतांची त्यानं पूर्णपणे मोडतोड केली. पिकासोनं एके ठिकाणी म्हटलं आहे – ‘इतरांच्या लेखी चित्रकला ही अनेक गोष्टींच्या बेरजेची मालिका असते, तर माझ्या लेखी ती एक विध्वंसाची बेरीज असते.’ फ्रेंच चित्रकार जॉर्ज ब्राक याच्यासोबत त्यानं ‘क्युबिझम’ची चळवळ सुरू केली. रेम्ब्रा, रुबेन्स यांच्या चित्रांतून दिसणाऱया गोड चेहऱयाच्या, गोऱया, गुबगुबीत बायकांना चित्रचौकटीतून हद्दपार करून पिकासोनं छोटय़ा ‘क्युब्स’च्या आकारांच्या सहाय्यानं क्रूर दिसणाऱया, निर्विकार चेहऱयांच्या आणि शारीरिक अवयवांचं प्रदर्शन मांडणाऱया स्त्र्ाया सादर केल्या.

पिकासोच्या चित्रकारकीर्दीचे जे विविध कालखंड जाणवतात, त्यामध्ये सुरुवातीला ‘ब्लू पीरिअड’मध्ये म्हणजे १९०१ ते १९०४ या काळात उदासवाण्या विषयांवरची (वेश्या, भिकारी वगैरे) आणि निळय़ा-करडय़ा रंगातली चित्रं त्यानं रंगवली. त्यानंतरच्या काळात म्हणजे १९०५ ते १९०७ या काळात ज्याला ‘पिंक पीरिअड’ म्हणतात, त्या काळात त्याच्या पॅलेटवरचे रंग उजळले. अनेक गोडगुलाबी, रोमँटिक चित्रं त्यानं रंगवली. त्याच्या ‘ब्ल्यू पीरिअड’मधल्या चित्रांमध्ये समुद्रकिनाऱयावरचे गरीब कुटुंब, सेलेस्टाईन हे व्यक्तिचित्र अशी काही तैलचित्रं उल्लेखनीय आहेत. मात्र खऱया अर्थानं पिकासोची ओळख कलाविश्वाला झाली ती १९०७ सालच्या ‘दम्वाझेल दि ऍव्हिनो’ या धक्कादायक तैलचित्रानं. यामध्ये वेश्यागृहातील पाच तरुण मुली दाखवलेल्या आहेत. भौमितिक आकारांची सपाट मांडणी असलेल्या या नग्नाकृतींच्या अंगावरचे मांसाचे गोळे आणि मुखवटय़ांसारखे थंड भावनाशून्य चेहरे यांनी पाहणाऱयांच्या नजरेला जबरदस्त धक्का दिला. त्यात पुन्हा करडय़ा, चॉकलेटी, यलो रंगांच्या वापरामुळं निर्माण झालेल्या या चित्रातील क्रौर्यानं गुलाबी रंगातल्या सुंदर, गोड चेहऱयाच्या बायका पाहण्याची सवय असणाऱया चित्ररसिकांना हादरवून टाकलं.

१९३७ साली पिकासोनं त्याचं सर्वाधिक चर्चा झालेलं भव्य चित्र ‘गर्निका’ सादर केलं. स्पॅनिश यादवी युद्धात गर्निका या शहराची तुफानी बॉम्बवर्षावामुळं जी वाताहत झाली त्याविरुद्ध पिकासोनं व्यक्त केलेल्या आक्रोशाचा किंवा निषेधाचा जबरदस्त आवाज म्हणजे हे चित्र होय. केवळ काळय़ा-पांढऱया रंगात भव्य कॅनव्हासवर विविध प्रतिमा या चित्रात काढल्या आहेत. यामध्ये तुटलेली तलवार, पेटलेली मशाल, विजेचा दिवा, बैलाचं तोंड, आकाशाकडं हात उंचावून आक्रोश करणारी स्त्री अशा अनेक प्रतिमा आहेत.

पिकासोच्या चित्रकारकीर्दीचं विश्लेषण करणारे अनेक लेख-पुस्तके जाणकार समीक्षकांनी लिहिली. त्याच्या निकटवर्तीयांनी त्याच्या आयुष्यावर, स्वभावावर प्रकाशझोत टाकणारी पुस्तकं लिहिली. यांमध्ये फर्नांद ऑलिव्हने लिहिलेलं ‘लव्हिंग पिकासो’ आणि फ्रान्सवाज जिलोनं लिहिलेलं (काही भडक) ‘लाइफ विथ पिकासो’ ही पुस्तकं गाजली. पण या पुस्तकांपेक्षा एका वेगळय़ा पुस्तकानं मला भारावून टाकलं. हे पुस्तक म्हणजे त्याच्या नातीनं – मरिना पिकासोनं लिहिलेलं ‘पिकासो, माय ग्रँडफादर’.

लंडनच्या विंटेज पब्लिशिंग कंपनीनं २००२ साली प्रकाशित केलेलं हे पुस्तक पिकासोवरच्या इतर पुस्तकांच्या भाऊगर्दीत अगदी निराळं आहे. खरं तर यात पिकासोच्या चित्रकारकीर्दीचं समीक्षकांना आकर्षण वाटेल असं काटेकोर विश्लेषण नाही की विसाव्या शतकातल्या कलाविश्वाचा अभ्यास करणाऱया कलेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल अशी माहिती नाही. हे पुस्तक म्हणजे एका प्रतिभावान आणि पूर्णपणे आपल्या कलाविश्वात मग्न अशा चित्रकाराची मानसिकता, त्याचं झपाटलेपण समजून घेण्याचा एक सच्चा प्रयास आहे. त्याचबरोबर पिकासोची नात एवढीच ओळख असण्यापासून ते स्वतंत्र व्यक्तिमत्त्व प्राप्त करणाऱया मरिनाला येणाऱया आत्मभानाचा हा एक विलक्षण प्रवास आहे. आजोबांविषयी खदखदणाऱया संतापाचं एक उदात्त मानवतावादी दृष्टीकोनात झालेलं ते एक मनोहारी रूपांतर आहे.

कलंदर, प्रतिभावान आणि झपाटलेल्या दिग्गजांची मानसिकता समजावून घेण्यात समाज आणि जवळचे नातेवाईक बऱयाचदा कमी पडतात. झांटिपी सॉक्रेटिसला जाणून घेऊ शकत नाही आणि आवली संत तुकारामाला कायम शिव्या घालत राहते. फार थोडय़ा वेळा व्हिन्सेंट व्हॅन गॉगसारख्या कलावंताला तेओसारखा कलंदर चित्रकाराचं मोठेपण ओळखून निस्सीम प्रेम करणारा भाऊ मिळतो आणि पिकासोसारख्या चित्रकाराची मानसिकता समजून घेणारी मरिनासारखी नात भेटते. या समजूतदार मरिनासाठी आवर्जून वाचावं असं पुस्तक म्हणजे – ‘पिकासो, माय ग्रँडफादर.’