राज्यातील प्राण्यांची बेकायदा विक्री थांबवा, हायकोर्टात याचिका

mumbai bombay-highcourt

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यात बेकायदा प्राण्यांची विक्री होत असून यावर बंदी घालण्यात यावी तसेच विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथील प्राणीविक्री केंद्रावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल असतानाच आता राज्यातील बेकायदा प्राण्यांच्या विक्री केंद्रावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी नवी याचिका शिवराज पटने यांनी ऍड. संजुक्ता डे यांच्यामार्फत हायकोर्टात दाखल केली आहे. राज्य प्राणी कल्याण मंडळाच्या प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही पेट शॉपना परवानगी देण्यात येऊ नये, प्राण्यांचे रक्षण करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच प्राण्यांची अनधिकृत विक्री करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.