भीमा-कोरेगाव : परमवीर सिंग यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका

सामना ऑनलाईन । मुंबई

एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे पुरावे मांडल्याप्रकरणी राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरीक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजीव भालेराव यांनी ही जनहित याचिका हायकोर्टात दाखल केली आहे.

परमवीर सिंह यांनी 31 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या पाचही शहरी नक्षलवाद्यांचा बंदी असलेल्या नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याचा दावा केला होता. अशाप्रकारे पुरावे जाहीर करून परमवीर सिंग यांनी कोर्टाचा अवमान केल्याचा दावा करत या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 7 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

काँग्रेस नक्षलवाद्यांचा ‘मित्र’, भाजपच्या गंभीर आरोपाने खळबळ

सर्वोच्च न्यायालयाची टिका अन् आता याचिका
दरम्यान, याच प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या पत्रकार परिषदेवर टिका केली होती. प्रकरण न्यायालयात असताना पोलीस पत्रकार परिषद कशी काय घेऊ शकता? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला गेला होता.

शहरी नक्षलवाद प्रकरण : पत्रकार परिषद घेतलीच कशी? हायकोर्टानं पोलिसांना सुनावलं

परमवीर सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाचे पुरावे पत्रकार परिषदेत सार्वजनिक केले असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोर्टाने राज्य सरकारला निर्देश देऊन घटनेच्या कलम 311 अन्वये या पोलिसांना सेवेतून बडतर्फ करावे अशीही मागणी केली आहे.

हिंदुत्ववाद्यांना कुणी वालीच नाही; नक्षलवाद्यांवरील कारवाईवरून देशभरात हंगामा