कोरठणच्या खंडोबारायाला लागणार देवाची हळद! भक्तांनी फुलला मंदिराचा परिसर


सामना प्रतिनिधी, नगर

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कोरठणगड, पिंपळगावरोठा येथील खंडोबारायाला पौष शु. षष्ठी शनिवार दिनांक 12 जानेवारी रोजी देवाची हळद लावली जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त वाद्यवृंदांच्या मंजुळ स्वरात सनई चौघडा ढोल ताशांच्या गजरात हजारो महिला भाविक भक्तांन सह पिंपळगावरोठा गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढली जाणार आहे. ही मिरवणूक दुपारी 2 वाजता कोरठण गडावर मार्गस्थ होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता श्री क्षेत्र कोरठण आणि पंचक्रोशीतील हजारो महिला भाविक भक्तांच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या जयघोषात कुलदैवताला हळद लावण्यात येणार आहे

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान प्रतिजेजुरी म्हणुन नावारुपाला आलेल्या महाराष्ट्र राज्य शासन ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेले आणि पर्यटन क्षेत्रात आपली भावी वाटचाल करत असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान कोरठणगड पिंपळगावरोठा या दैवताचा वार्षिक यात्रा महोत्सव सोमवार दिनांक 21 जानेवारी ते बुधवार दिनांक 23 जानेवारी रोजी मोठ्या भक्तिभावाने लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत आणि देवदर्शनाने संपन्न होत आहे.

पौष पौर्णिमेला खंडोबा देवाचा विवाह देवी म्हाळसेसोबत झाल्यामुळे या लग्न सोहळ्यानिमित्त कोरठणगडावर तीन दिवस यात्रा महोत्सव चालतो. महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविक भक्त आपले कुलदैवत आसल्या कारणांमुळे या ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी आणि कुलधर्म कुलाचार व देवदर्शनासाठी येत आसतात. पौष शुद्ध षष्ठीला देवाला हळद लावण्यात येते आणि मग तेथूनच देवाच्या यात्रा महोत्सवाची सुरुवात होते. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या प्रमाणात लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरी होणारी ही यात्रा महोत्सव म्हणून या यात्रा महोत्सवाकडे पाहिले जाते.

सर्वांनी हळदी सोहळ्यास उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेंद्र नरड , खजिनदार हनुमंत सुपेकर, चिटणीस मनिषा जगदाळे यांच्यासह सर्व आजी माजी विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ व मुंबईकर मंडळाने केले आहे.