महिलांनंतर पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

सर्वसाधारणपणे कुटुंब नियोजनासाठी महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात. पण या जाचातून लवकरच महिलांची सुटका होणार आहे. कारण बाजारात पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या येणार आहेत. शास्त्रज्ञ यावर संशोधन करत असून पुरुषांसाठी गर्भविरोधक गोळ्या तयार करत आहेत. या गोळ्या पुरुषांसाठी सुरक्षित असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. अमेरिकेतील ऑरगन हेल्थ अॅण्ड सायन्स युनिव्हर्सिटीतील नॅशनल प्रायमेट रिसर्च सेंटरमध्ये यावर संशोधन करण्यात येत आहे.

या गोळ्यांमुळे शुक्राणूंच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येते असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. यामुळे गर्भधारणेची शक्यता मंदावते. या गोळीमुळे लोकसंख्येवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य होईल असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. जर्नल पीएलओएस वन मध्ये यावर माहिती देण्यात आली आहे.

या गोळ्यांचा प्रयोग माकडांवर करण्यात आला असून तो य़शस्वी झाला आहे. या प्रयोगात माकडांवर गोळ्यांचा कुठलाही दुष्परिणाम झाल्याचे आढळले नाही असेही या जर्नलमध्ये सांगण्यात आले आहे.