उरण शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन फुटली

सामना ऑनलाईन । उरण

उरण शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा रविवार रात्रीपासून बंद झाला आहे. त्यामुळे ऐन ख्रिसमसच्या दिवशीच उरणच्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. ही पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

उरण शहराला एमआयडीसी मार्फत रानसई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. यासाठी दोन फुट व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. बोकडविरा-कोटनाका रस्त्यावर चारफाटा येथेचे ही पाईपलाईन फुटली आहे. बोकडविरा चारफाटा येथे सिडको-रल्वेचे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी खोदकाम करताना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही पाईपलाईन फुटली. मात्र पुलाच्या ठेकेदाराने ही पाईपलाईन तशीच मोकळी सोडली. याबाबत एमआयडीसीला कळविले नसल्याने रविवार रात्रीपासून सोमवारी दुपारपर्यंत ही पाण्याची गळती सुरूच होती.

सोमवारी दुपारी एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी पाईप लाईन दुरूस्त करण्यासाठी पाणी पुरवठा बंद केल्यानंतर पाण्याची गळती बंद झाली. सोमवार संध्याकाळपर्यंत ही पाईपलाईन दुरूस्त होईल असे एमआयडीसीचे उपअभियंता आर.डी बिरंजे यांनी सांगितले. या गळतीमुळे उरण शहरातील ३० हजार लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला.