‘पिप्सी’ : प्रतिबिंब, निरागस भावविश्वांचं

>>वैष्णवी कानविंदे-पिंगे<<

लहान मुलांचं भावविश्व वेगळंच असतं. या भावविश्वात त्यांना निरागसतेचं मोठं वरदान असतं आणि निस्सीम विश्वासाची देणगी असते… आणि याच कारणामुळे एखादं लहान मूल चटकन आवडून जातं, या लहान मुलांच्या छोटय़ाशा विश्वात सामावलेला विश्वास इतका खरा असतो की, नकळतच अनेक गोष्टी साध्यही होतात. ‘पिप्सी’ ही कथा अशी एका लहान मुलीची आणि तिच्यातल्या निरागस, निस्सीम विश्वासाची आहे.

राख नावाच्या अवघ्या पाचशे-सहाशे वस्तीच्या गावात राहणारी पाच सहा वर्षांची गरीब शेतकरी कुटुंबात राहणारी एक गोड मुलगी, पण स्वभाव कमालीचा चटपटीत आणि हुशार. एक दिवस तिला समजतं की, तिच्या आजारी आईला खूप काहीतरी मोठं झालंय आणि तिचं आयुष्य आता फक्त तीन महिने इतकंच आहे, पण त्याच वेळी तिचा लहानगा मित्र तिला धीर देतो. माणसाचा जीव माशात असतो या काल्पनिक कथेचा आधार घेत खरोखरचा मासा शोधत आणि त्याला जपत आईचा जीव वाचवण्यासाठी ती आपल्या मित्रासह आटापिटा करते. तिच्या आणि त्याच्या अतिशय निरागस आणि सुंदर भावविश्वाची कथा म्हणजे ‘पिप्सी’.

खरं म्हणजे ‘पिप्सी’ या कथेचा जीव फारच छोटा आहे. आईला वाचवायला आपल्यापरीने प्रयत्न करणारी छोटी मुलगी, पण त्यातल्या लहान मुलीचा अतिशय गोड वावर, तिला साथ देणाऱया तिचा लहानगा मित्र आणि चटपटीत संवाद यामुळे हा सिनेमा नक्कीच रंगतदार झालाय. ती नक्की काय प्रयत्न करते, तिच्या प्रयत्नाने तिची आई वाचते का, निरागस भाव किती खास असतो हे सगळं हा सिनेमा पाहताना उलगडतं.

अर्थात हा सिनेमा फक्त या दोन लहानग्यांच्या भोवतीच फिरत असल्यामुळे विविध प्रसंगांची मालिका तर दिसते, पण विशेष काहीच घडत नसल्याचं पण जाणवत राहतं आणि त्यामुळे या सिनेमाचा वेग किंचित मंद असला तरीही हा सिनेमा पाहताना कंटाळा येत नाही. मध्यांतराआधी आणि मध्यांतरानंतरही एका लयीत हा सिनेमा सुरू राहतो. शेवटाच्या अर्ध्या तासात मात्र ही लय जरा बिघडल्यासारखी होते. म्हणजे आपल्या आईचा जीव असणारा मासा वाचवण्यासाठी ती जेव्हा बोगदा पार करून जाते तोवर हा सिनेमा पेक्षकाला धरून ठेवतो खरा, पण नंतरची लगबग म्हणजे त्या माशाच्या प्रवासात जरा तोचतोचपणा यायला लागतो. तिथं थोडं काम केलं असतं तर सिनेमा अधिक खुशखुशीत झाला असता. असो, पण सिनेमा बनलाय मात्र गोड.

दिग्दर्शकाला पहिल्यापासूनच या सिनेमाचा जीव त्या बरणीतल्या माशाइतकाच आहे याची जाणीव आहे. मुलांना दिलेले संवाद उगाच वयापेक्षा जास्त किंवा अतिभावनिक, मोठे मोठे उतारे न ठेवता त्यातला नेमका वयाचा भाव पकडल्यामुळे चटकदार झालेयत. . या संवादांमुळेच सिनेमाची पकड अधिक घट्ट झालीय. पटकथाही बरी आहे. मुळात सिनेमाची लांबी कमी असल्याने त्याचा या सिनेमाला बऱयापैकी फायदा झाला आहे.

‘ता-ना-पि-हि-नि-पा-जा’ सारखं गाणं किंवा इतर सांगीतिक बाजूदेखील सिनेमातल्या व्यक्तिरेखांइतकीच खुशखुशीत.

आईचा मासा शोधायला ती मुलगी एकटी विहिरीत जाते तो प्रसंग किंवा ज्या बोगद्याची भीती असते त्या बोगद्यात मनाचा हिय्या करून शिरते आणि पलीकडे प्रकाशाची रेष दिसते तेव्हा मिळणारा आनंद अशा छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून भीती, त्यावर मात करायची मानसिकता आणि ती मानसिकता तयार होण्यासाठी आवश्यक असणारा मनाचा निग्रह छान दाखवलाय. माणसाच्या मनातली भीती, न्यूनगंड आणि ते पार करायची क्षमता अशा काही गोष्टी या प्रसंगांमधून सुप्तपणे अधोरेखित केल्या आहेत. त्या पाहताना आपलंही मन थोडं धास्तावतं, पण त्यातून बाहेर पडताना पाहून आशा आणि दृढनिश्चय कुठल्याही अडथळ्याला पार करू शकतो याची छोटीशी जाणीवही आपल्या मनाला सुखावते.

चानीची भूमिका साकारणारी मैथिली पटवर्धन अप्रतिम. सिनेमाच्या अगदी पहिल्या चौकटीपासून तिने अख्खा सिनेमा स्वतŠच्या खांद्यावर धरून ठेवला आहे. तिचे डोळे, तिचा वावर, तिची संवादफेक, वयाची निरागसता आणि परिस्थितीची जाणीव यांचा उत्तम समन्वय तिने आपल्या अभिनयातून अगदी सहज साकारला आहे. तिला तितकीच सक्षम साथ दिलीय साहील जोशी या लहानग्या गुणी अभिनेत्याने. अर्थात आजवर ‘रिंगण’, ‘अबक’ इत्यादी सिनेमांमधून त्याची साधारण सारखीच धाटणी दिसत असली तरी या सिनेमात तो चानीचा जिवाला जीव देणारा धिटुकला मित्र म्हणून शोभून दिसतो. अभिनयाच्या बाबतीत तो खूपच सक्षम आहे. फक्त यापुढे त्याने जरा वेगळ्या भूमिका स्वीकारल्या तर त्याच्यातला वेगळेपणा अधिक अधोरेखित होईल. कामं सगळय़ांची छान झाली आहेत. छायांकन, संगीत, कला इत्यादी गोष्टींतून या सिनेमात खरेपणा उभा राहिलाय. आपल्याला ज्या गोष्टी अगदी क्षुल्लक वाटतात, त्याच छोटय़ा गावखेडय़ांत किती महत्त्वाच्या असतील हे या सिनेमातल्या प्रसंगातून प्रकर्षाने जाणवतं. शिवाय आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणाऱया शेतकऱयाची मानसिकता, त्याच्या मनात साचत जाणारं नैराश्यं हे सगळं यातून अलगदपणे मांडलं आहे. खूप गजबजणारं नाटय़ न करता अगदी अलगद उलगडणारी ही कथा आणि लहान मुलांचं सुखावणारं भावविश्व हा सिनेमा पाहताना नक्कीच आनंद देऊन जाईल यात शंका नाही.

> दर्जा :    ***   > सिनेमा : पिप्सी > निर्माता : विधी कासलीवाल

> दिग्दर्शक : रोहन देशपांडे > लेखक : सौरभ भावे  > छायांकन : अविराम मिश्रा  > संगीत : देबारपितो सहा > कलाकार : मैथिली पटवर्धन, साहिल जोशी, अजय जाधव, अतुल महाले, अभिलाषा पाटील, पूजा नायक