बारा गावच्या पाण्यात जमलेलं पिठलं

>> शेफ विष्णू मनोहर

अभिनेता वैभव मांगले. बारा गावचं अन्न पाणी चाखून खाण्यावर मनापासून प्रेम करणारा वल्ली.

वैभव मांगले… एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व. माझी आणि वैभवची पहिली भेट सेटवरच झाली. खाण्याविषयीच्या गप्पांवरुनच आमची मैत्री घट्ट होत गेली. मित्र म्हणून आम्ही अधून-मधून बोलायचो आणि कार्यक्रमात भेटायचो. पण त्याची प्रत्यक्ष मुलाखत घेणे वगैरे हा प्रकार त्याच्याइतकाच मलाही जड गेला. कारण आम्ही नेहमीच गप्पा मारत असतो.

मध्ये काही दिवसांपूर्वी ‘अलबत्या-गलबत्या’.नागपूरला आलं होतं, दोघांनाही वेळेची कमी असल्यामुळे असं ठरलं की सकाळी 8 वाजता नागपूर एअरपोर्टवर नाश्त्याकरीता भेटायचं आणि गप्पा मारायच्या. ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी भेटलो आणि इडली-सांबार खाता-खाता गप्पांना सुरुवात झाली. वैभव मुळातच खाण्याचा शौकीन असल्यामुळे त्याने इडली, सांबार, ढोकळा, चीज-टोमॅटो सॅण्डविच आणि चहा इतक्या सगळ्या पदार्थांची ऑर्डर दिली. त्याचा आदल्या रात्री चंद्रपूरला प्रयोग होता आणि तो प्रयोग संपवून चंद्रपुरी पद्धतीच्या जेवणावर ताव मारुन ही मंडळी आली होती, म्हणून सुरुवात आमची चंद्रपुरी वडय़ावरुन झाली. नंतर त्या भागातील तिखट, मसालेदार जेवणाविषयी त्याला विचारले असता तो म्हणाला की नाटकाच्या प्रयोगानिमित्त बारा गावचं पाणी प्यायलो आहे. त्यामुळे याची सवय झाली आहे. कुठल्याही शहरातील जेवण आपलसं करुन घेतो असा तो म्हणाला.

मांसाहारी पदार्थ आवडतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला नागपुरातील सावजी पद्धतीचे पदार्थ, जसे पाया, खूर, मटण, चिकन इत्यादी अतिशय प्रिय आहे. बोलता-बोलता जेव्हा मी त्याला चंद्रपूर भागातल्या अय्ये (स्वयंपाकी) मंडळींबद्दल सांगितलं, तेव्हा त्याला त्याचं कुतूहल वाटलं. ते यासाठी की अय्ये हे चंद्रपूर लगतच्या तेलंगणा भागातील तेलगू आचारी. कामाच्या निमित्ताने ही मंडळी चंद्रपूर व त्या लगतच्या ठिकाणी येऊन स्थायिक झाली आणि ही गोष्ट ऐकल्यावर त्याने मला महाभारतातील एक किस्सा सांगितला, तो या कहाणीशी साधर्म्य असलेला होता.

तो किस्सा म्हणजे ज्यावेळी पांडव अज्ञातवासातून बाहेर आले, त्यावेळी भिमाने आपले झारे-सराटे भांडी एका मोठय़ा गाठोडय़ात बांधून ते गाठोडे हवेत फिरवून फेकून दिले. असे म्हणतात की ते पडले तेलंगाणा या भागात. तेव्हापासून तेथील लोकांना असे वाटायला लागले की देवाने आपल्याला सांगितलं आहे की आता तुमच्या गावातील सर्व मंडळी जेवण बनविण्याचं काम करतील. त्याचीच प्रचिती म्हणजे तेलंगी आचारी. यावर सहाजिकच माझा त्याला प्रश्न होता की तुला कशी काय माहिती या सर्व गोष्टींची. मीसुद्धा घरी रिकामं असतांना स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ बनविण्याचा प्रयोग करतो. यातून मला एक वेगळा आनंद मिळतो. पदार्थांच्या आवडी-निवडीबाबत विचारलं तर तो म्हणाला, सगळीकडे खूप फिरणे होत असल्यामुळे सगळीकडचं जेवण आवडतं. मला अजूनही आठवतं, ज्यावेळी तू माझ्याबरोबर ‘मेजवानी’मधे जो पदार्थ केला होता, तो मी लंच म्हणून एकटय़ानेच फस्त केला होता. त्याचं नाव ‘भातावरचं पिठलं’. पिठलं हा माझा वीक पॉइंट आहे. त्याने पिठल्याचेच दोन-चार प्रकार सांगितले. भातावरचं पिठलं, कुळथाचं पिठलं, दुधाचं पिठलं, झुणका, गुठळीचं पिठलं, रावण पिठलं, दह्याचं पिठलं इत्यादी.

  • भातावरचं कुळीथ पिठलं

bhatavarch-pithal

साहित्य – तांदूळ 2 वाटय़ा, कुळीथ 1 वाटी, दही अर्धी वाटी, हळद पाव चमचा, तिखट चवीनुसार, मोहरी 1 चमचा, हिंग पाव चमचा, जीरे 1 चमचा, कोथिंबीर 4 चमचे, मीठ चवीनुसार.

कृती – सर्व प्रथम कुळीथ, दही, मीठ एकत्र करुन चांगले घाटून घ्या. नंतर थोडे मीठ घालून भात शिजवून घ्या. 80 टक्के भात शिजल्यावर त्यामध्ये तयार केलेले कुळथाचे मिश्रण घालून भात मंद आचेवर पूर्णपणे शिजवा. तोपर्यंत हिंग, मोहरी, हळद, जीरे, कोथिंबीर याची फोडणी घालून ठेवा. सर्व्ह करतेवेळी त्यावर फोडणी घालून भात सर्व्ह करा. बरोबर सांडगा किंवा मिरची द्या.

  • गुठळीचं पिठलं

guthalich-pithal

साहित्य – बेसन (गुठळीचे) 2 वाटय़ा, दही अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, हिरवी मिरचीचे तुकडे 2 चमचे, लसूण 1 चमचा, हळद, हिंग पाव-पाव चमचा, मोहरी 1 चमचा, कोथिंबीर 4 चमचे.

कृती – सर्वप्रथम दह्यामध्ये बेसन, हिंग, हळद, मीठ व पाणी एकत्र करुन घाला. एका लोखंडी कढईत तेल घालून मोहरी, लसूण, हिरवी मिरची परतून त्यात थोडे पाणी व तयार केलेले बेसनाचे मिश्रण घाला. थोडे घट्ट झाल्यावर कोथिंबीरसह सर्व्ह करा.

  • कुळथाचं पिठलं

kulith-pithle

साहित्य – कुळथाचे पीठ 1 वाटी, दही अर्धी वाटी, लसूण 2 चमचे, मोहरी 1 चमचा, हिरवी मिरची 4-5, हिंग पाव चमचा, हळद पाव चमचा, तेल 4 चमचे, मीठ चवीनुसार, कोथिंबीर पाव वाटी.

कृती – 4 चमचे तेलात 2 चमचे बारीक चिरलेला लसूण, मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून थोडे हिंग, हळद घाला व 2 वाटया पाणी घाला. अर्धी वाटी दह्यात 1 वाटी कुळथाचं पीठ घालून पेस्ट बनवा. हे मिश्रण फोडणी दिलेल्या पाण्यात ओता. चवीनुसार मीठ घालून मिश्रणाला उकळी येवू द्या. थोडी कोथिंबीर घालून गरम भाताबरोबर सर्व्ह करा.

[email protected]