विधीमंडळाची अंदाज समिती बीडमध्ये येणार,घोटाळेबाज गर्भगळीत


उदय जोशी, बीड

महाराष्ट्राच्या विधीमंडळाची अंदाज समिती बीड जिल्ह्यात येणार आहे. या समितीमध्ये २७ आमदार तसेच सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांचा समावेश असतो. विविध विभागात मिळालेला निधी आणि झालेला खर्च या ताळेबंद ही समिती तपासणार आहे. जिल्ह्यात झालेली विकास कामे आणि त्यासाठी झालेला खर्च याचाही हिशोब तपासला जाणार आहे. समितीच्या दौऱ्यामध्ये घोटाळे, भ्रष्टाचार उघडकीस येण्याची भीतीमुळे काही खाते प्रमुख तसेच विभागप्रमुखांची भीतीने गाळण उडाली आहे.

या समितीने गेल्या वेळी जेव्हा बीड जिल्ह्याचा दौरा केला होता तेव्हा जलसंधारणाच्या कामात झालेला भ्रष्टाचार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेला रस्ते घोटाळा,प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्तीची बोगस कामे तसेच जिल्हा परिषदेतील आर्थिक अनियमितता उघडकीस आणली होती. २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या समितीच्या दौऱ्यादरम्यान पुन्हा एकदा घोटाळ्यांच्या सुरस कथा बाहेर येण्याची दाट शक्यता आहे.

असे असणार कामकाज
बुधवारी २९ ऑगस्ट रोजी रात्री समिती बीडमध्ये दाखल होणार आहे. गुरुवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृहावर संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत समितीचे सदस्य  चर्चा करणार आहेत. बुधवारी सकाळी ९.३० वाजता नगर विकास, अन्न पुरवठा, ग्राहक संरक्षण, वैद्यकीय शिक्षण, सहकार, जलसंपदा विभागाच्या कामकाजाची झाडाझडती घेणे सुरू होईल. ही समिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर विश्वास न ठेवता स्वत: प्रकल्पांची पाहणी देखील करणार आहे. दुपारी ३ वाजता भेटीदरम्यान आढळून आलेल्या अनियमिततांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पुन्हा बैठक होणार आहे.

आ.अनिल कदम,आ.धनंजय गाडगीळ, आ. उन्मेष पाटील, आ. कृष्णा पंचमखोपडे, आ. श्रीमती देवयानी फरांदे, आ. विजय राहांगदळे, आ.राजेश काशीवार, आ.दादासाहेब मुरकुटे, आ.आकाश फुंडकर, आ.कृष्णा गजबे, आ. रमेश बुंदीले, आ.सुनील प्रभू, आ. प्रकाश आबीटकर, आ. संजय रायमूलकर, आ.प्रतापराव चिखलीकर, आ. विजय वडेट्टीवार,आ. कुणाल पाटील, आ. वसंतराव चव्हाण, आ.शामराव पाटील, आ. दत्तात्रय भरणे, आ. प्रदीप जाधव, आ. धैर्यशील पाटील, आ. अबू आझमी, आ. सुजितसिंह ठाकूर, आ. निलमताई गोऱ्हे,आ. राहुल नार्वेकर, आ. अनंतराव गाडगीळ, यांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे