धारावी पुनर्विकास प्रकल्प गतीने राबविण्यासाठी नियोजन करावे, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सामना प्रतिनिधी, मुंबई

धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी घेण्यात आली. त्यावेळी धारावी पुनर्विकास प्रकल्प गतीने राबविण्यासाठी नियोजन करावे आणि पुनर्विकास प्रकल्पाचे लाभ लवकरात लवकर मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुंबई म.न.पा. आयुक्त अजोय मेहता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुंबई विकास आराखडय़ाचे विशेष कार्य अधिकारी रामनाथ झा, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास उपस्थित होते. धारावी पुनर्विकास प्रकल्प सुरू करण्यापूर्वी तात्पुरत्या स्थलांतरासाठी मोठय़ा प्रमाणात घरांची आवश्यकता लागेल. त्यादृष्टीने जागेच्या उपलब्धतेबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. झोपडपट्टी पुनर्विकास जलद गतीने व्हावा, यासाठी उपलब्ध सर्व पर्यायांवर यावेळी सांगोपांग चर्चा करण्यात आली.