पत्रावळी, द्रोणच्या दुकानांमध्ये छापा; व्यापाऱ्यांकडून पाच हजार रुपयांचा दंड वसुल

1
action-against-plastic-plate

सामना प्रतिनिधी । जालना

नगर पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने बुधवारी 13 फेब्रुवारी दुपारी बंसीपुरा भागातील पत्रावळी, द्रोणच्या दुकानांमध्ये छापा मारला. या छाप्यात प्लास्टिकच्या पत्रावळ्या, द्रोण, ग्लास आदी साहित्याचे 30 डाग (बॉक्स) जप्त करण्यात आले. याप्रकरणी सदर व्यापाऱ्याकडून पाच हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला.

याविषयी अधिक माहिती अशी की, शासनाने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर धाडसत्र राबविण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी 13 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास वीर सावरकर चौक परिसरातील बंसीपुरा भागात कश्मिरीलाल रमेशकुमार नावाच्या दुकानावर प्रदूषण नियंत्रण अधिकारी संतोष दहिफळे, स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे, विलास गावंडे, पंडित पवार यांच्या पथकाने छापा मारला. या छाप्यात प्लास्टिकच्या पत्रावळ्या, द्रोण, ग्लासेस आदी साहित्याचे 30 डाग (बॉक्स) जप्त करण्यात आले.

या साहित्याचे मोजमाप झाले नसल्याने त्याची मूळ किंमत अजून काढण्यात आली नसल्याचे पथकप्रमुख अशोक लोंढे यांनी सांगितले. दरम्यान, सदर व्यापाऱ्यांकडून पाच हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आल्याचेही लोंढे यांनी सांगितले.