लातूर मनपाच्या वतीने ३६९ किलो प्लॅस्टिक, थर्माकोल व कॅरीबॅग जप्त


सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील गोलाई परिसरातील प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ३६९ किलो प्लॅस्टिक, थर्माकोल व कॅरीबॅग जप्त करून ३२००० रुपये दंड वसूल करण्यात आला.

लातुर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिक व व्यापाऱ्यांना सूचना करण्यात आली होती की प्लॅस्टिक व कॅरीबँक, थर्माकोलच्या वस्तू वापरण्यास राज्य शासनाच्या वतीने बंदी घालण्यात आलेली आहे. तरी देखील शहरातील काही ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर होत असल्याच्या तक्रारी मनपाकडे येत असल्याने लातूर शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने कारवाई करून ३६९ किला प्लॅस्टिक, थर्माकोल व कॅरीबॅग जप्त ३२००० रुपये दंड वसूल करण्यात आला.

२३ मार्च २०१८ पासून महाराष्ट्र शासनाने प्लॅस्टिक कॅरीबॅग आणि प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वस्तूचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी असल्याने आपल्या घरातील व दुकानातील प्लॅस्टिकचा साठा मनपाच्या नजीकच्या संकलन केंद्रात किवा घंटा गाडीकडे जमा करावे अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या. तरीही शहरात प्लॅस्टिकचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्लॅस्टिकचा वापर बंद करावा अन्यथा वापर करत असल्याचे निदर्शनास आल्यास महानगरपालिकेच्या वतीने यापुढे दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संभाजी वाघमारे, सहाय्यक आयुक्त वसुधा फड, अतिक्रमण विभाग प्रमुख सहदेव बोराडे, शेख, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रवींद्र क्षीरसागर, गवळी, दरसेवाढ व अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांनी केली.