7 बालनाट्य एकाच तिकिटावर!

सध्या सुट्टय़ांचा मौसम आहे. जुन्या बालनाटय़ांचा ठेवा नव्या रूपात येतो आहे. बालचमू… चला नाट्यास्वाद  घेऊया.

‘चल रे भोपळय़ा टुणूक टुणूक’, ‘सांग सांग भोलानाथ’, ‘मामाच्या गावाला जाऊया’, ‘बुड बुड घागरी’, ‘अकबर बिरबल’, ‘विक्रम आणि वेताळ’, ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ या बालनाटय़ांची मजा घेण्याची संधी बालप्रेक्षकांना घेता येणार आहे. हल्ली टीव्ही, यूटय़ूब, फेसबुक, व्हिडीयो गेम, मोबाईल गेम, व्हॉटस्ऍप… अशा अनेक ऍप्समुळे बालकांच्या मनोरंजनाच्या संकल्पना बदलल्या असल्या तरी आजही मुलांना बालनाट्य पाहावीशी वाटतात. याकरिता जुनी बालनाटय़े नव्या रूपात बालप्रेक्षकांना पाहता येईल. महत्त्वाचे म्हणजे ही सर्व नाटकं एकाच तिकिटावर बघण्याची ही अनोखी संधी आहे. या बालनाटय़ांचे नव्या रूपातील लेखन राजेश कोळंबकर, तर दिग्दर्शन राहुल इंगळे आणि सागर जेठवा यांनी केले आहे. आज दुपारी 12 वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे तर सायंकाळी 7.30 वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे या बालनाटय़ांचे प्रयोग होणार आहेत.

याविषयी दिग्दर्शक राहुल इंगळे सांगतात, जो संदेश यातून मुलांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे त्यासाठी बालनाट्याचा गाभा तसाच ठेवला आहे. आजच्या काळातील गोष्टी ज्या मुलांना पटतील, कळतील असे बदल करून आम्ही हे नाटकं सादर करत आहोत. ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ नाटकातील सर्व भाग तसाच ठेवलाय. यातील चाळीस चोर म्हणजे आजच्या काळातील समाजाला लुटणारे, राजकारणी, डॉक्टर्स, बिल्डर्स असे काही बदल केले आहेत.

मुलांमध्येही या नाटकांविषयी खूप उत्सुकता आहे. कारण वेगवेगळय़ा व्यक्तिरेखा साकारण्याची त्यांना संधी मिळते. यामुळे त्यांचे मराठी वाचन होते. त्यामुळे मुलांना मराठी वाचता येते याचा पालकांनाही आनंद वाटतो. या नाटकांमुळे त्यांना मराठी ऐकण्याची, बोलण्याची, वाचण्याची सवय लागली. काही जुन्या गोष्टीही ती जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागली आहेत, असे ते म्हणाले. बाल कलाकारांबरोबर दिग्दर्शक म्हणून काम करताना आलेल्या अनुभवाविषयी राहुल इंगळे सांगतात, मुलांबरोबर काम करताना स्वतःला मूल होऊन त्यांच्याबरोबर काम करावे लागते. नाटकाची गोडी ज्या मुलांना आहे, त्यांना समजेल अशा पद्धतीने काम समजावून सांगताना दिग्दर्शक म्हणून मलाही खूप शिकायला मिळतंय. एकदा मुलांना शिकवले की, न विसरता ती मनापासून काम करतात. चार ते अठरा वर्षांपासून या नाटकांत बाल कलाकार भूमिका करत आहेत. त्यामुळे बालप्रेक्षकांनाही त्यांच्याकडून बरंच शिकायला मिळेल.

तीन बालनाटय़ांचा एक प्रयोग 

अकबर बिरबल, विक्रम वेताळ आणि अलिबाबा चाळीस चोर तसेच चल रे भोपळय़ा टुणूक टुणूक, मामाच्या गावाला जाऊया, सांग सांग भोलानाथ या तीन बालनाटय़ांचा वेगळा प्रयोग. अशी एकत्रित ही नाटकं बालरसिकांना एकाच वेळी पाहायला मिळतील.