रंगभूमी हेच त्याचे दैवत – मयूरेश पेम

> तुझं आवडतं दैवत?- ‘रंगभूमी’ मला दैवतासमान आहे.

> तिचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं?- ती खरी आहे. भूमिका सादर करताना चूक झाली तर नापसंती मिळते आणि अचूक वेळेत उत्तम अभिनय सादर केला तर टाळ्या मिळतात.

> संकटात ती कशी मदत करते असं वाटतं?- नाटक आपल्याला सावरून घेतं असं वाटतं. कधी कधी कलाकार नवीन असतात, सेट कोसळतो, आयत्यावेळी कोणाला तरी भूमिका करावी लागते, दिवे जातात तेव्हा त्या परिस्थितीत काही गोष्टी सुचतात, ज्या तालमीच्या वेळी सुचत नाहीत. आतापर्यंत नाटक सादर करत असताना काही तरी अडचण आलीय त्यामुळे ते थांबवावं लागलंय असं कधीही झालं नाही.

> कला आणि भक्तीची सांगड कशी घालतोस?- रोज प्रयोग करतो. यामुळे दर प्रयोगाला माझ्यातील कला विकसित होत जाते. स्वतःतली कला साकारण्यासाठी कलाकाराला त्याच्या कलेच्या माध्यमातून सतत व्यक्त व्हावं लागतं.

> तुझ्यातली कला साकारण्याकरिता रंगभूमी तुला कशी मदत करते?- कलाकार म्हणून रंगभूमी हे माध्यम मला सगळ्यात जास्त आवडतं. शब्दफेक किंवा कोणत्याही गोष्टीला भिडण्याची ताकद, निराश असतानाही सकारात्मकदृष्टय़ा कसं उभं राहावं हे मला रंगभूमीकडून शिकायला मिळालं. रंगभूमीने शिस्त शिकवली.

> रंगभूमीला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय असा प्रसंग?- दर प्रयोगाला आम्ही प्रार्थना करतो. प्रयोग संपल्यावरही प्रार्थना करतो. प्रेक्षकांचं मनःपूर्वक हसून घरी जाणं हेच माझ्यासाठी यश आहे.

> तिच्यावर रागावतोस का? – मला इतर कलाकारांचा राग येतो, पण रंगभूमीचा कधीच राग येत नाही.

> तिचं कोणतं स्वरूप जास्त आवडते? – कोणत्याही कलेला ती स्वातंत्र्य देते. त्यामुळे मनापासून काम करायला आवडतं. ती सगळं आपल्याला देते. आपल्यातल्या कलेने आपण समोरच्याला मोहित करायचं असतं. तिचं वेगळं स्वरूप आहे असं वाटत नाही.

> तिच्याकडे काय मागतोस? – प्रत्येक प्रयोग य़शस्वीपणे पूर्ण होऊ दे त्यामध्ये माझ्याकडून काही चुकामूक नको होऊ दे. भरभरून यश मिळू दे.

> तिची नियमित उपासना कशी करतोस?- प्रयोग करून तर करतोच शिवाय स्वतःचे केलेले प्रयोग बघतो. शिवाय इतर कलाकारांची नाटकंही मी बघतो. त्याचा अभ्यास करतो. मी रसिकही तेवढाच आहे जेवढा कलाकार आहे.