नगरमध्ये गांधी विरूद्ध गांधी, भाजप खासदाराने अतिक्रमण केल्याची तक्रार

सामना ऑनलाईन । नगर

भाजपचे नगरचे खासदार व शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांच्या बंगल्यातील अतिक्रमणाबाबतची प्लॉट मोजणी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक संतोष धोंगडे यांनी खासदार गांधी यांच्यासह या प्रकरणातील तक्रारदार विनोद गांधी आणि महापालिकेच्या बुरुडगाव-केडगाव प्रभाग समितीचे प्रमुख नाना गोसावी यांना उपस्थित राहण्याचे कळवले आहे.

कोठी ते यश पॅलेस रस्त्याच्या रुंदीकरणाच्या वेळी या रस्त्यातील अतिक्रमणे महापालिकेने काढली होती; मात्र, या रस्त्यावरील खा. गांधी यांच्या बंगल्याच्या कंपाउंडचे अतिक्रमण काढले गेले नाही, असा दावा तक्रारदार विनोद अमोलकचंद गांधी यांनी केला होता. त्यांनी महापालिकेकडे दाद मागितल्यानंतर संबंधित अतिक्रमणावर कारवाई झाली नसल्याचे सांगून त्यांनी नगरविकास विभागाकडेही तक्रार केली होती. पण तेथेही दाद न मिळाल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती. या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी, खासदार गांधी यांच्या बंगल्याचे कंपाउंड अतिक्रमणात आहे की नाही, हे ठरविण्यासाठी त्याचे मोजमाप करण्याचे मनपाद्वारे सांगण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी ही मोजणी केली जाणार आहे.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार नगररचना योजना क्रमांक ३ अंतिम फायनल प्लॉट क्रमांक ६६ मधील अतिक्रमणाबाबत प्लॉटची मोजणी करण्याचे काम मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता सुरू करण्यात येणार असून, या वेळी या मोजणीच्या ठिकाणी पुराव्याच्या मूळ व छायांकित कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे खासदार गांधी व तक्रारदार विनोद गांधी यांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोठी रोडवरील खासदार गांधींचा बंगला पत्नी व दोन भावांच्या नावावर असून दुसऱ्या व्यक्तीकडून ही मालमत्ता खरेदी केल्याचा दावा गांधींकडून करण्यात आला आहे. नगररचना विभागाच्या परवानगीने या बंगल्याचे बांधकाम झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.