प्लुटोच्या शिखरावर!

[email protected]

१९५३ मध्ये एडमण्ड हिलरी यांच्यासह एव्हरेस्ट हे हिमालयातलं आणि पृथ्वीवरचंही सर्वोच्च शिखर पादाक्रांत करणारे शेर्पा तेनसिंग नोर्गे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. जेमतेम पाच फूट उंची त्यांना लाभली होती, पण ‘‘मी जगातला सर्वात ‘उंच’ माणूस आहे’’ असं ते म्हणू शकत होते. ही उंची होती अर्थातच त्यांच्या अथक परिश्रमांची आणि कर्तृत्वाची. आता हे नाव थेट प्लुटो या छोटय़ा ग्रहापर्यंत पोचलं असून प्लुटोवरच्या दोन पर्वतराजींना (रेंजेस) तेनसिंग आणि एडमंड हिलरी यांची नावं देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय खगोल संस्थेने (इन्टरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन) घेतला आहे.

सूरश्री केसरबाई केरकर यांचा स्वर व्हॉएजर यानावर सूर्यमालेपलीकडे कसा गेला हे आपण मागच्या एका लेखात वाचलं. आता हे दुसरे हिंदुस्थानी नाव ग्रहमालेतील एखाद्या ठिकाणाशी निगडित होणार आहे. आपल्या ग्रहमालेत असलेल्या ग्रहांपैकी शेजारच्या मंगळावरील माऊंट ऑलिमास हा सर्वोच्च पर्वत मानला जातो. मात्र प्लुटोवरच्या पर्वतराजीला दोन महत्त्वाच्या साहसी गिर्यारोहकांची नावं देऊन प्लुटोचाही सन्मान होत आहे.

बिचाऱ्या प्लुटोचं ग्रहपद त्याचा शोध लागल्यापासूनच संशयाच्या भोवऱ्यात फिरत होतं. प्लुटोचा उपग्रह मानला गेलेल्या शेरॉनचाही आकार त्या ग्रहाएवढाच असल्याने ही जुळ्या ग्रहांची ग्रहमालेतील एकमेव जोडी ठरली होती. मग यापैकी ग्रह कोणाला म्हणायचं? शिवाय ग्रहपद लाभण्यासाठी आपल्या कक्षेत सर्वोच्च स्थान असल्याचं प्लुटोला सिद्ध न करता आल्याने तो ड्वार्फ किंवा ‘खुजा’ ग्रह ठरला. २००४ मध्ये प्राग येथे झालेल्या खगोल संशोधक आणि अभ्यासकांच्या सभेने त्याचं ग्रहपद काढून घेतलं. आता ऍस्ट्रॉनॉमिकल युनियनने त्यावरील दोन पर्वतरांगांना मोठी नावं दिली हे चांगलं झालं.

२०१५च्या जुलै महिन्यात न्यू होरायझन या अवकाशयानाने प्लुटोचं जवळून दर्शन घेतलं. त्यावेळी त्याच्यावर असलेली विवरं आणि दऱ्या-डोंगरांचं जवळून दर्शन घडलं. पृथ्वीवरचा माणूस नावाचा एकमेव प्रगत सजीव आपल्याला ज्ञात आहे. माणसांपैकीच अनेकांनी प्रगतीची नित्य नवी क्षितिजं धुंडाळण्याचा अव्याहत प्रयत्न केल्याने आपल्याला आजची विविध क्षेत्रांतील प्रगती दिसत आहे.

न्यू होरायझन यानाने प्लुटोपलीकडच्या किपर-बेल्ट या विशालकाय अशनींच्या पट्टय़ाचाही वेध घेतला आहे. शेर्पा तेनसिंग आणि एडमंड हिलरी यांच्याव्यतिरिक्तही मानवी कर्तृत्वाशी निगडित व्यक्ती आणि घटनांची नावं प्लुटोपर्यंत पोचली आहेत.

१९३० मध्ये क्लाइड टॉम्बो यांनी प्लुटो ग्रहाच्या अस्तित्वाचं भाकीत केलं तेव्हापासून त्याला ग्रह म्हणावं की नाही याचा वाद सुरू झाला. शेवट त्याचं ग्रहपद गेलं तेव्हा क्लाइडची नव्वदी पार केलेली पत्नी उद्गारली, ‘‘प्लुटो ‘ग्रह’ मानला काय आणि न मानला काय, क्लाइडचं संशोधन तर सिद्ध झालंच आहे आणि हा नवा निर्णय वैज्ञानिक निकषांचा आदर करणाऱ्या क्लाइडने नक्कीच मान्य केला असता.’’

मात्र प्लुटोला त्यावेळी ‘प्लुटो’ हे नाव मिळालं ते एका शाळकरी मुलीच्या सूचनेवरून! वेनेशिया बर्नी (१९१८-२००९) ही १९३० मध्ये अवधी अकरा-बारा वर्षांची होती. क्लाइड टॉम्बो यांनी नवा ग्रह शोधल्याचं समजताच तिने त्यासाठी ‘प्लुटो’हे नाव सुचवलं आणि ते मान्यही झालं! आता प्लुटोवरच्या एका मोठय़ा विवराला ‘बर्नी क्रेटर’ म्हणतात!

स्पुटनिक-१ हे पहिलं मानवनिर्मित यान रशियाने अवकाशात यशस्वीरीत्या धाडलं त्याला आता ६० वर्षे पूर्ण झाली. त्याचं स्मरण कायम राहावं म्हणून प्लुटोवरच्या एका मोठय़ा पठाराला ‘स्पुटनिक पठार’ असं म्हटलं जाणार आहे. मानवी कर्तृत्वाच्या इतिहासातल्या अशा अनेक गोष्टी आता सूर्यमालेत आणि त्याबाहेरसुद्धा पोचत आहेत. सभोवतालच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला ‘सुज्ञ’ (सेपियन) सजीव म्हणून माणसाचं ‘प्राणी’पण इतरांपेक्षा निराळं आहे. सात अब्ज माणसांच्या समूहात या प्रजातीला उन्नतीच्या मार्गाला नेणारी नावं तुलनेने फारच कमी असली तरी त्यांचं कर्तृत्व विश्वाकार आहे!