हिंदुस्थानी सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

1

सामना ऑनलाईन । मुंबई

आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुस्थानी सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्‌घाटन झाले. या कार्यक्रमावेळी आमिर खान, रोहित शेट्टी, आशा भोसले, मनोज कुमार, प्रसून जोशी, शाम बेनेगल असे दिग्गज उपस्थित होते. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर राव हे सुद्धा उपस्थित होते.

या अद्ययावत संग्रहालयासाठी 140.61 कोटी रुपये खर्च आला आहे. दृक-श्राव्य, ग्राफिक्स, प्रदर्शन आणि मल्टी मिडियाच्या माध्यमातून हिंदुस्थानी सिनेमाचा 100 हून अधिक वर्षांचा प्रवास कथाकथनाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. शाम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील संग्रहालय सल्लागार समितीने या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. या संग्रहालयाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रसून जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नाविन्यपूर्ण संशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. हे संग्रहालय दोन इमारतींमध्ये तयार करण्यात आले आहे. मुंबईतील फिल्म्स डिव्हिजन परिसरातील 19 व्या शतकातील ऐतिहासिक गुलशन महल आणि नवीन इमारतीत हे संग्रहालय आहे.

संग्रहालयाची वैशिष्ट्यै

  • गांधी आणि सिनेमा : यामध्ये महात्मा गांधीच्या जीवनावरील चित्रपटच नव्हे तर हिंदुस्थानी चित्रपटांवरील त्यांच्या जीवनाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे.
  • बाल चित्रपट स्टुडिओ : यामध्ये संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना विशेषत: मुलांना चित्रपट निर्मितीमागील विज्ञान, तंत्रज्ञान आणि कला यांचा शोध घेण्याची संधी मिळणार आहे तसेच कॅमेरा, लाईट, शुटींग, अभिनय यासारख्या चित्रपटांशी संबंधित विविध पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव संवादाच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. येथे क्रोमा स्टुडिओ, इमर्सिव्ह एक्सपिरियन्स झोन, स्टॉप-मोशन, ॲनिमेशन स्टुडिओ, व्हर्च्युअल मेकओवर स्टुडिओ यांचा समावेश आहे.
  • तंत्रज्ञान, सृजनशीलता आणि हिंदुस्थानी चित्रपट : रुपेरी पडद्यावर छायाचित्रणाचा परिणाम दाखवण्यासाठी हिंदुस्थानी चित्रपट दिग्दर्शकांनी वापरलेल्या तंत्रज्ञानाचा सर्जनशील वापर या ठिकाणी पाहायला मिळतो.
  • संपूर्ण देशाभरातील चित्रपट : देशभरातील छायाचित्रण संस्कृतीच्या बदलणाऱ्या स्वरुपाचे दर्शन येथे घडते.