Pulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर …

pm modi-imran-khan

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. राजस्थानमधील टोंक येथे झालेल्या संकल्प सभेत मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करून देत थेट आव्हान दिले.

‘इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना मी फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या आणि म्हणालो की आतापर्यंत आपण खूप लढलो आहोत आणि आता गरिबी व निरक्षरतेविरुद्ध लढायला हवे. तेव्हा इम्रान खान म्हणाले होते की, मोदीजी मी पठाणाचा मुलगा आहे. मी कधी खोटो बोलत नाही. जर खरचं इम्रान खान पठाणाचा मुलगा असेल तर त्यांनी त्यांचे शब्द सत्यात उतरावयला हवे’, असे मोदी म्हणाले.

बदला पुरेपूर घेतला जाईल

पंतप्रधान पुढे म्हणाले की, मला आपल्या जवानांचा अभिमान आहे. पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांचा बदला त्यांनी 100 तासांमध्ये घेतला. जगभरातील प्रत्येक देशाने पुलवामा हल्ल्याचा निषेध केला आहे. सीमेवर लढणाऱ्या जवानांवर आणि सरकारवर विश्वास ठेवा. याचा बदला पुरेपूर घेतला जाईल, असे मोदी म्हणाले.

दहशतवाद्यांचे कारखाने बंद करण्याची जबाबदारी माझ्यावर

तसेच तुमचा प्रधानसेवक दहशतवाद्यांना पुरवठा करणारी सर्व साधनं बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत दहशतवाद्यांचे कारखाने सुरु राहतील, तोपर्यंत जगात शांतता निर्माण होणे अशक्य आहे. दहशतवाद्यांचे कारखाने बंद करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असेही मोदी म्हणाले. हा बदललेला हिंदुस्थान असून, हल्ला गुपचूप सहन करणार नाही. आम्ही दहशतवादाला कसे चिरडायचे हे जाणतो, असेही मोदी म्हणाले.

आमची लढाई कश्मीरसाठी, कश्मीरमधील नागरिकांविरोधात नाही

तसेच आमची लढाई कश्मीरसाठी आहे, कश्मीरमधील नागरिकांविरोधात नाही. आज देशातील प्रत्येक नागरिक जवानांसोबत आहे. पण, काही जण देशात राहुनही पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. हिंदुस्थानने पाकिस्तानच्या नाड्या आवळल्याने आता पाकिस्तान खूप अडचणीत सापडला आहे, असेही मोदी म्हणाले.