LokSabha Elections 2019 पंतप्रधान मोदींचे दोन मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ओडिशामधून बीजेडीचे राज्य जाणे हे नक्की आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले तसेच, पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी विकासाच्या गतीत स्पीड ब्रेकर बनल्या आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. मोदींनी ओडिशातील केंद्रपाडामध्ये आणि पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये सभेदरम्यान टीका केली.

मोदी ओडिशामध्ये म्हणाले की, “बीजेडी इतकी घाबरली आहे त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. शेतकर्‍यांसाठी आम्ही एक योजना सुरू केली होती. त्या योजनेनुसार शेतकर्‍यांच्या खात्यात थेट निधी जमा होणार होती. परंतु नवीन पटनाईक सरकारने गरजू शेतकर्‍यांची यादी देण्यास नकार दिला.” त्यामुळे ही योजना शेतकर्‍यांपर्यंत नाही पोहोचू शकली असा आरोप मोदींनी केला.

पश्चिम बंगालमधील झालेल्या सभेत मोदींनी बंगालमधील घोटाळ्यांवरून ममता दीदींना घेरले. मोदी म्हणाले की, “आज घोटाळ्यांमध्ये तृणमूल काँग्रेस काँग्रेस पक्षाला टक्कर देत आहे. नारदा, सारदा आणि रोजवॅली घोटाळे हे फक्त घोटाळे नसून ते गरीबांच्या जीवनाच्या विरोधात केलेले गुन्हे आहेत. जेव्हा एखादा मुख्यमंत्री घोटाळे करण्यार्‍याच्या बाजूला उभे राहतात तेव्हा काय परिस्थिती निर्माण होते हे तुम्हाला माहित असेलच” असेही मोदी म्हणाले.